गुहागर मतदारसंघावर भाजपचा दावा

bjp
खेड(प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोकणात आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच गावभेटी सुरू केल्या आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार डॉ. विनय नातू यांना महायुतीकडून उमेदवारी मिळावी, अशी मागणी तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली असून लवकरच वरिष्ठांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
२००९ पर्यंत भाजपाचा बालेकिल्ला राहिलेल्या गुहागरमधून पुन्हा एकदा गुहागरवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपाला गेला होता. याच विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार कै. तात्यासाहेब नातू यांनी तब्बल चारवेळा आमदारकी भूषवली होती. त्यानंतर या ठिकाणी चारवेळा भाजपकडून डॉ. विनय नातू हे आमदार राहिले आहेत. मात्र २००९ मतदारसंघाच्या पुनर्रचनेत जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदारसंघ बाद झाला.
राज्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना, भाजपा व अजित पवार यांची राष्ट्रवादी, रामदास आठवले यांची आरपीआय अशी महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता हा मतदारसंघ भाजपकडे यावा, अशी तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. गुहागरचे विद्यमान आमदार व ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना या निवडणुकीत पराभव करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. माजी आमदार डॉ. नातू हे पुन्हा एकदा गुहागर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.