खेडचे सुपुत्र अरुण प्रभू याचे प्रयत्न
खेड (प्रतिनिधी)
खेडमधील सुपुत्राच्या कल्पनेतून रत्नागिरीचा हापूस आंबा आयर्लंडमध्ये पोहोचला असून आयरिश नागरिकांना रत्नागिरीच्या हापूस आंब्याची चांगलीच भुरळ पडली आहे. खेडचा सुपुत्र अरुण प्रभू याच्या प्रयत्नाने रत्नागिरीचा हापूस थेट आयर्लंडमध्ये पोहोचला आहे.

खेडचा सुपुत्र अरुण राजन प्रभू याने यापूर्वीच आयर्लंड येथे स्पाईस इंडिया या रेस्टॉरंटची निर्मिती केली. या रेस्टॉरंटमध्ये भारतीयच नव्हे, तर आयरिश नागरिकांना आपल्या चवीची भुरळ घालत अल्पावधीतच आयर्लंडमध्ये स्पाईस इंडिया हे रेस्टॉरंट प्रसिद्ध झाले. अरुण प्रभू याने गेली दहा वर्षे गोग्रीन एक्सपोर्ट कंपनीचे सचिन कदम यांच्या माध्यमातून एक संकल्पना अंमलात आणली आहे.
कोकणातील रत्नागिरीचा हापूस आंबा आयर्लंड येथे आस्वाद मँगो या नावाने अरुण प्रभू यांनी विक्रीसाठी उपलब्ध केला आहे आहे. आतापर्यंत तेथील नागरिकांनी ५,००० आंब्यांची खरेदी केली असून आंब्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणातील हापूस आंबा आयलंडला सचिन कदम यांच्या गो ग्रीन एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून जाणार असल्याचे सांगण्यात आले.










