पशुवैद्यकीय अधिकारी व प्राणीप्रेमींच्या संघटित प्रयत्नांना यश : मालवण शहर धुरीवाडा येथील घटना
मालवण | प्रतिनिधी : कुंपणाच्या तारांमध्ये अडकून गंभीर जखमी होत मृत्यूशी झुंज देणाऱ्या श्वानाला मदतकार्याच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र दळवी व प्राणीप्रेमीनी जीवदान दिल्याची संवेदनशील घटना मालवण शहर धुरीवाडा येथे घडली.
मालवण शहरातील धुरीवाडा खोतमठ जवळील रस्त्याच्या बाजूला एका कुंपणाला लावण्यात आलेल्या लोखंडी तारेला एक श्वान अडकला. तारेची अनेक धारदार टोके असलेली गाठ श्वानाच्या उजव्या बाजूच्या मागील पायाच्या बाजूला खोलवर रुतली होती. वेदनेने व्हिवळणाऱ्या त्या श्वानाने जिवाच्या आकांतात अडकलेल्या तारेपासून सुटका करून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नात त्याचा तारेभोवतीचा फेरा अधिकच घट्ट बसला. त्यामुळे अडकलेल्या भागाला पीळ पडल्याने तार त्याच्या पायात आणखी घट्ट जाऊन रुतली. घाबरलेल्या त्या श्वानाने सर्व शक्तिनीशी सुटका करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात त्याची त्वचा फाटून निघाली.
या दरम्यान, येथील चेतन खोत या युवकाने तसेच रस्त्यावरून मार्गक्रमण करणारे आपा मालंडकर यांनी सामाजिक भावानेतून पशु वैद्यकीय अधिकारी रवींद्र दळवी यांना संपर्क साधत परिस्थितीची माहिती देत येण्यासाठी विनंती केली. याच वेळी प्रणिमित्र चंद्रवदन कुडाळकर यांनाही संपर्क करण्यात आला.
दरम्यान येथील तळाशीलकर यांनी काठीच्या साहाय्याने श्वानाची सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र तार घट्ट बसल्याने त्यांच्या प्रयत्नांना त्यात यश आले नाही.
काही वेळात प्राणी मित्र चंद्रवदन कुडाळकर आपल्या सहकाऱ्यासह तार कापण्यासाठी कटर सह दाखल झाले.
पशु वैद्यकीय अधिकारी रवींद्र दळवी हेही तातडीने वैद्यकीय साहित्यासह त्याठिकाणी पोहचले. भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर कटरच्या साहाय्याने तार कापून श्वानाला तारेपासून वेगळे करण्यात यश आले. चेतन खोत याने श्वानाला उचलून जवळच असलेल्या आपल्या निवासस्थानी आणले. त्याठिकाणी डॉ. दळवी यांनी गंभीर जखमी श्वानाच्या पायात घट्ट रुतून बसलेली तार काढली. विविध औषधंउपायांनी जखम पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून आपले वैद्यकीय कसब पणाला लावून अथक प्रयत्नाने सुमारे सहा इंच फाटलेल्या श्वानाच्या त्वचेला अनेक टाके घातले. त्यानंतर जखम जलद गतीने ठीक होण्यासाठी आवश्यक इंजेक्शन डॉ. दळवी यांनी श्वानाला दिली.
पशु वैद्यकीय अधिकारी श्री. दळवी यांनी पशु वैद्यकीय सेवा बजावताना सुमारे दोन तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मृत्यूच्या दारातून एका मुक्या जीवाला बाहेर काढून संवेदनांची प्रचिती दाखवून दिली. याबाबत सर्व स्तरातून पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र दळवी तसेच मदतकार्यात सहभागिंचे कौतुक होत आहे.










