खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील दस्तुरी येथील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी तब्बल दोनदा उपोषणास बसलेले ज्येष्ठ नागरिक मोहम्मद हुसेन अब्दुल परकार यांनी स्थगित केलेले उपोषण ६ जूनपासून पुन्हा सुरू करण्याचा इशारा दिला.आहे
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जोपर्यंत अतिक्रमण हटविण्यात येत नाही तोपर्यंत ते उपोषण कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खेड तालुक्यातील दस्तुरी येथील दापोली महामार्गालगत अतिक्रमण झाल्याने स्वतःच्या जागेत जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. यामुळे जागेशेजारी झालेले अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी जागा मालक मोहम्मद हुसेन अब्दुल परकार यांनी . २९ फेब्रुवारी रोजी उपोषण केले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता यांनी १५ मार्चपर्यंत हे अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर परकार यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. मात्र १५ मार्च उलटूनही परकार यांना दिलेले आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण न केल्याने त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले होते.
त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने परकार यांना खेड पोलिसांकडून १९ मार्चपर्यंत पोलिस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी केल्याचे सांगत पोलिस बंदोबस्त मिळाला की अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देखील दिले. त्यामुळे दुसऱ्या वेळेस देखील आपले उपोषण मागे घेतले होते. मात्र, अद्याप या ठिकाणचे अतिक्रमण बांधकाम विभागाकडून न हटवल्याने स्थगित उपोषण सुरू करणार असल्याची माहिती माध्यमांना परकार यांनी दिली.







