केसरकरांची साथ सोडल्यानंतर किती मते मिळाली याचे आत्मचिंतन करा
तीन वेळा नगराध्यक्ष असताना किती वेळा गेले मंत्रालयात : पोकळेंचा सवाल
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी आजपर्यंत अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यामुळे सावंतवाडीकर नागरिक देखील केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. केसरकर यांच्या कृपेनेच बबन साळगावकर हे तीन वेळा नगराध्यक्ष झाले. मात्र, त्यांना डावलून निवडणूक लढविल्यानंतर साळगांवकर यांना किती मते मिळाली याचे त्यांनी आत्मचिंतन करावे आणि नंतरच केसरकर यांच्या विरोधात आघाडी उघडावी, असा टोला माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी लगावला.
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात पत्रकार परिषदेत टिका केली होती. त्याला माजी उपनगराध्यक्ष तथा दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक राजन पोकळे यांनी उत्तर दिले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, आनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, शर्वरी धारगळकर, भारती मोरे, दिपाली सावंत, संजय पेडणेकर, माधुरी वाडकर, क्रीर्ती बोंद्रे आदी उपस्थित होते.
तत्कालीन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय प्रकल्प अंतर्गत तीन शहरांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी मंजुरी दिली होती. रस्ता खोदून टाकल्यास तो पुर्ववत करावा लागतो म्हणून निधी नियोजन मंडळातून देण्यासाठी सकारत्मक प्रयत्न केला. मात्र, साळगावकर यांच्या हट्टापाई भूमिगत वीज वाहिनी होऊ शकली नाही व निधी परत गेला. मात्र, साळगावकर हे खापर आता केसरकर यांच्यावर फोडत असून गेले काही दिवस सातत्याने दिपकभाई यांच्या विरोधात टीका करत आहेत. मात्र, सावंतवाडीकर जनता सुजाण असून त्यांना खऱ्या खोट्याची जाण आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील २५ ते ३० वर्षापासून केसरकर यांनी सावंतवाडी शहराचा कायापालट केला. श्वेता क़ोरगावकर नगराध्यक्ष असताना ३६ कोटी रुपयांची भुयारी गटार योजना मंजूर झाली. मात्र, केसरकर यांनी कधीही स्वतः नगरपालिकेच्या कामांचे श्रेय घेतलेले नाही. संत गाडगेबाबा मंडईचे काम सुरू झाले आहे. सर्व संबंधितांना पर्यायी जागा मिळवून दिलेली आहे. असे असताना उगाच या प्रकल्पाबाबत देखील लोकांचा गैरसमज साळगावकर करत आहेत, असा आरोप राजन पोकळे यांनी केला.
भुमिगत वीज वाहिनी टाकली असती तर तर ५० वर्ष काळजी नव्हती. साळगावकर यांच्या हट्टापायी ही योजना होवू शकली नाही त्यामुळे उगाच दिपक केसरकर यांना टार्गेट केले जाते. दीपक केसरकर यांच्यामुळे तीन वेळा नगराध्यक्ष झालेले बबन साळगावकर एक वेळा किती मतांनी पडले आणि त्यांना किती मते मिळाली यांचे त्यांनी आत्मचिंतन करावे. त्यांच्या किती माणसे आहेत हे आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
साळगावकर यांनी नगराध्यक्ष म्हणून कधीही मुंबईला जाऊन निधी आणण्यासाठी पुढाकार घेतला नाही. सारं काही मंत्री तसेच आमदार म्हणून दीपक केसरकरच करत होते. हे त्यांनी ध्यानात घ्यावे. उगाच केसरकर यांच्या विरोधात आघाडी उघडणार असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचे त्यांनी थांबवावे, असे राजन पोकळे यांनी सांगितले.












