घर मालकाच्या संमतीशिवाय छपराची दुरुस्ती, वासे कौले, रीपा, वासे काढून चार लाखाचे नुकसान

एकावर गुन्हा दाखल, कुरंग मधलीवाडी येथील घटना

लांजा (प्रतिनिधी) घराच्या छपराची दुरुस्ती करण्यास मालकाची संमती नसतानाही घराच्या छपरा वरील कौले, लाकडी रिपा, वासे काढून चार लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी झर्ये येथील एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लांजा तालुक्यातील कुरंग मधली वाडी येथे दिनांक १५ ते २१ एप्रिल या कालावधीत घडली होती.

श्रीपाद महादेव कदम (वय ५२, सध्या राहणार विकास टॉवर, सह्याद्री नगर, मीरा भाईंदर, जिल्हा ठाणे) यांनी याबाबतची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात केली होती. श्रीपाद कदम व साक्षीदार यांचे लांजा तालुक्यातील कुरंग मधलीवाडी येथे सामूहिक मालकीचे घर आहे. सामूहिक मालकीचे आणि छप्पर एक असलेल्या व अंतर्गत विभक्त असलेल्या घराच्या दुरुस्तीचे काम बाळकृष्ण रमेश पांचाळ (राहणार झऱ्यें तालुका राजापूर) यांनी घेतले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर श्रीपाद कदम यांनी बाळकृष्ण पांचाळ यांना माझे सोडून तू इतरांच्या घराच्या छपराच्या दुरुस्तीचे काम कर असे सांगितले होते. मात्र तरी देखील बाळकृष्ण पांचाळ यांनी श्रीपाद कदम व साक्षीदार यांच्या घराच्या छपरा वरील कौले, लाकडी रिपा, वासे काढून त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून, अतिक्रमण करून छपरावरील कौले, वासे, रिपा यांची मोडतोड करून तसेच आतील सामानाची नासधूस केली. तसेच ०४ लाख रुपयांचे नुकसान केले.
याप्रकरणी श्रीपाद कदम यांनी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी बाळकृष्ण पांचाळ यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२९(४), ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत.