खेडला कोणी मुख्याधिकारी देता का हो?

विकासकामे रखडली; आस्थापनातील रिक्त पदांमुळे नागरिकांची परवड

खेड (प्रतिनिधी) पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असला तरी खेडमध्ये मान्सून पूर्व तयारीचा बोजवारा उडाला आहे. पूरग्रस्त, दरड प्रवण भाग असलेला तालुका असल्याने पावसाळ्यात येथे आपत्कालीन परिस्थिती साठी सक्षम कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची गरज असते. परंतु येथे पालिकेला अद्याप मुख्याधिकारी नेमणूक झालेली नसल्याने नागरी सुविधा पुरवताना प्रभारी कारभाराचा फटका बसत आहे. त्यामुळे येथे कोणी मुख्याधिकारी देता का हो? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सद्यस्थितीत देवरूखचे मुख्याधिकारी चेतन विसपुते यांच्याकडे येथील नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यांचे अंतर व भौगोलिक परिस्थिती पाहता पदभार सांभाळताना त्यांची कसरत होत असून येथील नगर परिषदेत अवघा एक दिवस ते हजर रहात असल्याची माहिती समोर आली आहे.

अजूनही कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्ती करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवरून कुठल्याच हालचाली झालेल्या नाहीत. खेडला पावसाळ्यात पुराचा फटका बसण्याची शक्यता अधिक असते. यामुळे इतर तालुक्यांच्या तुलनेने येथे पालिकेने अधिक मान्सूनपूर्व तयारी करणे गरजेचे आहे. परंतु प्रभारी अधिकाऱ्यांमुळे यावर्षी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

आधीच पालिकेच्या आस्थपनेतील पदे रिक्त असल्याने नागरिकांची परवड सुरू असून विकासकामांचाही फज्जा उडाला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला तरी आपत्तीपूर्व नियोजनही फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. येथील नगर परिषदेत हर्षला राणे यांच्या रूपाने कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त झाल्या होत्या. यानंतर अवघ्या सहा महिन्यातच मुख्याधिकारी हर्षला राणे यांची अन्यत्र तडकाफडकी बदली झाली. त्यानंतर येथील नगर परिषदेत कारभार प्रभारी सुरू झाला. तो आजमितीसही कायम आहे. यामुळे विकासकामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. कर्मचाऱ्यांमध्येही कोणाचाच कोणाला ताळमेळ राहिलेला नसल्याने सर्वच विकासकामे रखडली आहेत. पाणी पुरवठा, स्वच्छता आदी विषयांमध्ये शहरातील विविध भागांत गोंधळ उडाला आहे. शासनाने तातडीने येथे मुख्याधिकारी व आवश्यक सर्व अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.