एसटी महामंडळाकडून पर्यटन, देवदर्शन व वर्षा सहलीसाठी विशेष नियोजन-प्रज्ञेष बोरसे

 

समुहांच्या मागणीप्रमाणे प्रत्येक आगातुन एसटी बस उपलब्ध करून देणार

नरेंद्र मोहिते | राजापूर : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी) सक्षमिकरणाबाबत तसेच कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याबाबत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे एस. टी. महामंडळ आता कात टाकू लागले असून सेवेतही सुधारणा होत आहे. प्रवाशांना एस.टी. सेवेकडे आकर्षित करण्यासाठी महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना तिकीटात दिलेली ५० टक्के सुट, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ वर्षावरिल नागरिकांना मोफ प्रवास यामुळे एस. टी. च्या प्रवाशी संख्येत वाढ होऊन प्रवाशांचा एस.टी. सेवेवरचा विश्वास अधिक दृढ होत आहे. आता एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी सवलतीच्या दरात खास जादा यात्रा सहलींसाठी तसेच पावसाळी पर्यटनासाठी विशेष गाडयांचे नियोजन करून तशा गाडया सवलतीच्या दरात समुहांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे. रत्नागिरी विभागाच्या वतीनेही जिल्हयातील सर्व आगारांमधून अशा प्रकारे सवलतीच्या दरात यात्रा सहलीसांठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेष बोरसे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यापारी संघ, क्रीडा मंडळे, ग्रामस्थ मंडळ, शेतकरी संघ, सहकारी संस्था यांच्या अभ्यास दौऱ्यांसाठी व विविध सहलींसाठी त्यांच्या सोयीनुसार आणि आवश्यकतेनुसार संबंधितांनी मागणी केल्यास त्या आगारातुन सवलतीच्या दरात बसेस देण्यात येणार आहेत. तर पर्यटन क्षेत्राच्या दर्शन सहलींचे आयोजन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

यासाठी प्रवाशांचे गटप्रमुख यांनी प्रत्येक आगारात संपर्क साधावा जेणेकरून त्यांच्या सोयीने सहलींचे नियोजन करणे सुलभ होईल असे आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या विविध सवलतींचे लाभधारक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. सर्व समाज घटक प्रवाशांना धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे येथे जाण्यासाठी व परत येण्यासाठी प्रत्येक आगाराकडून टू बाय टू, एम एस बॉडी बसेस यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील असेही बोरसे यांनी नमुद केले आहे.

रत्नागिरी जिल्हयातील श्री क्षेत्र गणपतीपुळे, पावस, रत्नागिरी दर्शन, देवगड, कुणकेश्वर, मालवण या भागात पर्यटन सहलींसाठी तसेच श्री ज्योतिबा, महालक्ष्मी श्री क्षेत्र करवीर नगरी, श्री विठ्ठल रखुमाई पंढरपूर, श्रीदेवी भवानी माता तुळजापूर, श्री सिद्धेश्वर महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट, तसेच अकरा मारुती त्याचप्रमाणे अष्टविनायक यात्रा सहलींना यापूर्वी चांगल्या प्रमाणात प्रतिसाद प्रवासी समूहाकडून मिळाला होता. त्याच पद्धतीचे नियोजन वर्षा सहलीसह विविध पर्यटन क्षेत्रात जाण्यासाठी प्रवासी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महिला सन्मान योजना अंतर्गत महिलांसाठी ५० टक्के तसेच अमृत ज्येष्ठ नागरीक ७५ वर्ष पूर्ण प्रवासाना मोफत प्रवास सवलत आहे आणि ६५ वर्षे पुर्ण झालेल्या प्रवाशांना प्रवास भाडयामध्ये ५० टक्के सवलत आहे. या अशा सर्व प्रवासी सवलतीने समूह गटांना बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. या विशेष पर्यटन सहल बसेस मधून सर्व प्रकारचे सवलती दिल्या जाणार आहेत. एक वस्ती, दोन दिवस, दोन वस्ती तीन दिवस आणि तीन वस्ती चार दिवस अशा प्रवासासाठी या बसेस पूर्व नियोजनानुसार आगाऊ संपर्क साधल्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या विविध सवलतींपैकी म्हणजेच ०४ दिवस व ०७ दिवस आवडेल तेथे प्रवास पास, रेस्क्युहोम मुलांसाठी सहलीसाठी, पुनवर्सन केंद्रातील मानसिकदृष्टया विकलंगता, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार कर्मचारी वर्गासाठी २० दिवसाचे प्रवास भाडे भरून ३० दिवस प्रवास करण्याचे, ५० दिवसाचे प्रवास भाडे भरून ९० दिवसांचा प्रवास करता येईल,शालेय व सर्व प्रकारचे शैक्षणिक पास प्रत्येक स्थानकावर देण्याचे कामकाज सुरू आहे. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पास वितरित करण्यासाठी नियोजन करण्याचे हेतूने संस्थांकडून आगारात संपर्क साधण्यात यावा जेणेकरून वि‌द्यार्थ्यांचा वेळ व प्रवास भाडे वाया जाणार नाही. यासाठी सर्व आगार व्यवस्थापक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी नजीकच्या आगारात संपर्क साधावा.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पासेस सवलत ही विद्यार्थिनींच्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे व सुरक्षिततेसाठी शासनाकडून मोफत राबविण्यात येते. या योजनेचा सर्व विद्यार्थिनींसाठी आणि विदयार्थ्याना ६६.६७ टक्के प्रवास भाडयामध्ये सवलत लाभ घेता येईल. तसेच शैक्षणिक संस्थाना पासेस वितरित करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तरी राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सवलतींचा या योजनेद्वारे लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेष बोरसे यांनी केले आहे.