उभादांडा मानसिश्र्वर येथे पाण्याच्या पाईप लाईंनसाठी होणारे रस्ता खोदकाम ग्रामस्थांनी रोखले

वेंगुर्ले : दाजी नाईक
तिलारी वरून येणाऱ्या पाणीपुरवठा पाइप लाइनसाठी उभादांडा मानसिश्र्वर येथे बांधकाम विभागाची परवानगी न घेता रात्री अचानक रस्ता खोदकाम ठेकेदाराने सुरू केले होते. या बाबत उभादांडा ग्रामस्थांना कळतच माजी जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांच्या सह ग्रामस्थांनी हे काम रोखले. रीतसर परवानगी नसेल तर खोदकाम करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा उपस्थित ग्रामस्थांनी घेतला.

तिलारी वरून चिपी विमानतळापर्यंत जाणाऱ्या पाईप लाईन चे काम सुरू आहे. हे काम उभादांडा मानसिश्र्वर येथे आल्यावर तेथे रस्ता खोद काम अचानक कोणतीही परवानगी न घेता सोमवारी रात्री करण्यास सुरुवात करण्यात आली. हे समजताच माजी जि. प.सदस्य दादा कुबल, भाजपा जिल्हा युवामोर्चा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, युवा मोर्चा विधानसभा प्रमुख हितेश धुरी, उभादांडा शक्तीकेंद्र प्रमुख निलेश मांजरेकर, मच्छीमार नेते दादा केळुसकर, माजी सरपंच देवेंद्र डीचोलकर, तुषार साळगावकर आणि ग्रामस्थ यांनी हे काम रोखले.

दरम्यान आज सकाळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ही हे रस्ता खोद काम करण्याची परवानगी घेतली नसल्याचे पुन्हा उघड झाले. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यावर सरवासारव म्हणून रस्ता खोदकाम करून त्यावर सिमेंटीकरण करून देतो असे पाणी पुरवठा ठेकेदाराकडून सांगण्यात आले. मात्र सिमेंटीकरण न करता रस्ता डांबरीकरण करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. साईटवर काम करते वेळी कोणी अधिकारी उपस्थित नव्हते तसेच हे काम काल रात्रीच्या वेळेस का केले जात होते याचे हि उत्तर अधिकाऱ्यांनी द्यावे.

संबंधित कामाची वर्क ऑर्डरची मागणी केली असता त्यांनी देण्यास नकार दिला. त्यामुळे रीतसर काम सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही असे ग्रामस्थांनी सांगितले. पाईप लाइन किंवा पाणी अडवणे यासाठी आमचा आक्षेप नाही पण रस्त्या पासून काही अंतरावर होत असलेल्या नवाबाग बीच वर बंधाऱ्याचे काम सुरू आहे तेथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये – जा सुरू आहे. त्यामुळे सिमेंटीकरण रस्ता फार काळ टिकणार नाही त्यामुळे रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे.