पाऊस सुरू तरीही खेडमध्ये पाणीटंचाई समस्या कायम

खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली असली तरी पाणीटंचाईचे सावट कायम आहे. कळंबणी बुद्रुक- दंडवाडी, तिसंगी-धनगरवाडी, सवेणी-धनगरवाडी आदी ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली होती. अखेर तीनही गावातील वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात १७ गावे ४४ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करताना प्रशासन अक्षरश: मेटाकुटीस आले आहे. अपुऱ्या टँकरअभावी ग्रामस्थांनाही टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्रामस्थ अक्षरशः हवालदिल झाले आहेत. पाणीटंचाई रौद्ररूप धारण करत असल्याने ग्रामस्थ रडकुंडीस आले आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांत आणखी तीन गावातील तीन वाड्यांची भर पडली असून प्रशासनाकडून याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे.