मान्सूनच्या जलधारानी आज पासून टँकर घेणार ब्रेक

दमदार पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा

खेड(प्रतिनिधी) तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जलस्रोतांमध्ये साठा उपलब्ध झाला आहे. यामुळे तहानलेल्या गावांमध्ये धावणाऱ्या टँकरर्सना १४ जूनपासून ‘ब्रेक’ लावण्याचा निर्णय पंचायत समितीच्या पाणी विभागाने घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ग्रामस्थांची मागणी आल्यास त्या गाव-वाड्यांना पुन्हा टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने ठेवल्याचे सांगण्यात आले.

 

 

८ एप्रिलपासून टँकरने सुरू झालेला पाणीपुरवठा आजमितीस १७ गावातील ४४ वाड्यांना एक दिवसाआड करण्यात येत होता. यासाठी सुकिवली-चोरद नदीपून ६ हजार लिटर क्षमतेच्या एका शासकीय टँकरसह ५ हजार लिटर क्षमतेच्या खासगी टँकरद्वारे लाखो लिटर पाण्याचा उपसा करून तहानलेल्या ग्रामस्थांची तहान शमवली जात होती. यासाठी दोन्ही टँकरच्या एक दिवसाआड १६४ फेऱ्या धावत होत्या. यंदा पाणीटंचाईच्या आराखड्यात २८ गावे ५३ गाडयांचा समावेश होता. त्यातील १७ गावातील ४४ वाड्यांमध्ये पाण्याचा टँकर धावत होता. यंदाही सर्वाधिक पाणीटंचाईचे चटके धनगरवाड्यांना बसले.

 

 

गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे खवटी, तिसंगी, कशेडी, कुळवंडी या चार गावातील वाड्या वगळता अन्य गाव- वाड्यांना होणारा टँकरने पाणीपुरवठा तूर्तास बंद करण्यात आला आहे. उर्वरित चारही वाड्यांचा पाणीपुरवठाही १४ जूनपासून बंद होणार आहे.