छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना सिंधुदुर्गची निवेदनाद्वारे मागणी
वेंगुर्ले | दाजी नाईक : सिंधुदुर्ग जिल्हयातील बऱ्याच ठिकाणी आंबा उत्पादक शेतक-यांचा आंबा परिपक्व होण्यासाठी जवळजवळ एप्रिलच्या शेवटच्या आठवडयामध्ये सुरुवात होते. त्यामुळे शासनाने दिलेला शेतक-यांना १५ मे चा जोखीम कालावधी यामध्ये बदल करुन तो ३१ मे पर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच धुके, थ्रीप्स, ढगाळ हवामान, किडीच्या तीव्रतेची नोंद ही सुदधा या घटकांमध्ये नोंद असणे आवश्यक आहे, अशी मागणी निवेदनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना सिंधुदुर्ग यांच्यातर्फे वेंगुर्ले तालुका कृषी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.
वेंगुर्ले तालुका कृषी अधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. शामसुंदर कृष्णा राय, कार्य. सदस्य श्री. प्रमोद यशवंत सावंत, श्री. अर्जुन लुकाराम नाईक, श्री.रामकृष्ण राजाराम चिचकर, श्री. आग्नेल फर्नांडिस, श्री. सतीश भास्कर मडव, श्री प्रकाश विष्ठक वारंग यांच्यासह विजय कृष्णा सरमळकर, महादेव गावडे यांच्यासह अन्य बागायतदार सदस्य यावेळी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने पुर्नरचित हवामान आधारित विमा योजना २०२४-२५ करीता शेतक-यांच्या खालील मागण्यांचा गांभिर्याने विचार करावा यामध्ये फळपिक विम्यामध्ये कोकम या फळपिकाचा व फणस या फळपिकांचा समावेश व्हावा, रब्बी हंगामातील आंबा करीता संरक्षण कालावधी १ नोव्हेंबर ते ३१ मे असावा, काजू करीता अवेळी पाऊस कमी तापमान याचा कालावधी १ नोव्हेंबर ते ३१ मार्च पर्यंत असावा.
त्याच प्रमाणे आंब्याकरीता तापमानाचा त्रिगल ३७ च्या वर आहे तो ३६ पर्यंत असावा, धुके, ढगाळ हवामान इत्यादी घटकांच्या नोंदी त्याचप्रमाणे थ्रीप्स हवामानाच्या बदलामुळे थ्रीप्स वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्याचाही समावेश असावा. फळमाशीच्या व किडीच्या तीव्रतेची नोंद घटकांमध्ये असावी. हवामानाच्या इतर घटकांप्रमाणे वेगाचा वारा याची झालेल्या नोंदीनुसार भरपाई मिळावी. वैयक्तिक पंचनामा ही अट रद्द करावी, जादा तापमान या घटकांसाठी कारणीभूत ठरणा-या घटकांचा समावेश धोक्यामध्ये करण्यात यावा. अवेळी पाऊस या घटकांमध्ये माहे नोव्हेंबर ते ३१ मे कालावधी किमान ५ मिली पाऊस भरपाई साठी पात्र असावा. १० मिलीची अट रद्द करावी. कारण पाऊस कितीही कमी झाला तरी नुकसान हे होतेच आदी मागण्या यावेळी निवेदनात करण्यात आल्या आहेत.











