आर्थिक देवघवीतून विवस्त्र करीत तिघांना मारहाण

इन्सुली घाटीतील खळबळजनक प्रकार

तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल : ४ दिवसांची पोलिस कोठडी

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबई गोवा जुन्या राज्यमार्गावर इन्सुली घाटीत तिघा जणांना विवस्त्र करून मारहाण केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. आर्थिक देवघेवीच्या वादातून ही घटना घडली असून यातील दिपेश गणपत वरसगावकर ( ४० रा. सालईवाडा मुळ रा. नेरुर देऊळवाडी ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार अकरा जणांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सदरचा प्रकार ११ जून रोजी घडला होता. याप्रकरणी हेमंत सत्यवान वागळे ( २९ ),विलास दत्तात्रय पोपकर ( वय ५१ ) ,वृषाल विलास पोपकर (वय २२ तिघे ) रा. इन्सुली तसेच अनिकेत अरुण परब (वय ३१ ) अरुण धोंडू परब ( वय ५८ दोघे रा.चराठा ) व शुभम शिवप्रसाद शितोळे (वय २६ रा. सबनिसवाडा सावंतवाडी ),भिवा लक्ष्मण मुळीक (वय ३२, ) यशवंत भानुदास नार्वेकर (वय ४२ ) रामचंद्र लवू नाईक (वय ३१ तिघे रा. इन्सुली ) बाबू गावडे, रा. निगुडे ) त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर यातील एक जण फरार आहे.

याबाबत पोलिस निरिक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी दिपेश वरसगावकर हा सावंतवाडी येथे राहतो. तो एका कंपनीकडून पेपर प्लेट मशीन घेवून अन्य लोकांना विकतो. तुम्ही पैसे द्या,आपण मशीन आणून देतो असे सांगून त्याने पोपकर आणि परब अशा तीघांची दोन लाख ऐंशी हजाराची फसवणूक केली होती. वारंवार पैसे मागितल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या चौघा संशयितांनी आपण नोटरी करुया. तु आम्हाला भेटायला ये, असे सांगून त्याला सावंतवाडीत भेटले. त्याठीकाणी त्याची गाडी आणि मोबाईल हीसकावून त्याला जबरदस्तीने इन्सुली येथे नेले. त्याठीकाणी जमलेल्या अन्य संशयितांनी लाकडी दांडा तसेच कमरेतील पट्ट्याच्या सहाय्याने वरसगावकर याला मारहाण केली.

तसेच त्याचा पार्टनर मकरंद कुलकर्णी याला त्या ठीकाणी बोलवित त्यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर अन्य एक सहकारी योगेश आडणेकर यालाही बोलावून त्या तिघांना विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार इन्सुली येथील जंगल परिसरात घडला. दरम्यान, याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुम्हाला जीवे ठार मारू, अशी धमकी देवून त्यांना सोडण्यात आले.
या प्रकारानंतर वरसगावकर याने येथील कुटीर रुग्णालयात दाखल होवून उपचार घेतले. त्यानंतर तब्येत सुधारल्यानतर शुक्रवारी सायंकाळी सावंतवाडी पोलिस ठाण्यात या अकरा ही जणांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार हेमंत वागळे याच्यासह अकरा जणांच्या विरोधात ३२७,३४७,३२४,५०४, ५०६,१४३,१४७,१४८,१४९ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चोवीस तासाच्या आत संबधित संशयितांना अटक केली यातील एक अद्याप ही फरारी आहे त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे असे पोलिस निरिक्षक इंगवले यांनी सांगितले.