महेश सारंग यांची तहसीलदारांकडे मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : कोलगाव आणि डेगवे गावांसाठी कायमस्वरूपी तलाठी नेमणूक करण्यात यावी म्हणून जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली. दरम्यान, तात्पुरती सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्यासह मधुकर देसाई, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, खरेदी विक्री संघाचे संचालक प्रवीण देसाई, चंदन धुरी, कोलगाव माजी सरपंच संदीप हळदणकर आदी उपस्थित होते.
महेश सारंग व संतोष राऊळ म्हणाले, कोलगाव,निरूखे व भोम या तीन गावांना कायमस्वरूपी तलाठी नसल्याने लोकांना, विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या उत्पन्न दाखला, शेती कर्ज योजना,ई पीक नोंदणी योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.
डेगवे या ठिकाणी कायमस्वरूपी तलाठी द्या अशी मागणी मधुकर देसाई, प्रवीण देसाई यांनी केली. यावेळी महेश सारंग म्हणाले,कोलगाव आणि डेगवे गावांसाठी कायमस्वरूपी तलाठी द्या तसेच तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना सेवा देण्यासाठी नियोजनबद्ध खबरदारी घेतली पाहिजे. तसेच किसान सन्मान योजना राबविण्यात आली आहे. त्या योजनेनुसार अर्ज छाननी करून लवकरच लाभ मिळावा म्हणून पुढाकार घेतला पाहिजे याकडे तहसीलदार श्रीधर पाटील यांचें लक्ष वेधले.
तहसीलदार श्रीधर पाटील यांनी तलाठी मंडळ निहाय पदभार देऊन शेतकरी, विद्यार्थी यांना लागणाऱ्या सेवा सुरळीत दिल्या जातील असे आश्वासन दिले.
मराठा आरक्षणावर आर्थिक दृष्ट्या मागास दाखला देण्यासाठी प्रयत्न केला जावा म्हणून महेश सारंग, मधुकर देसाई, सरपंच संतोष राऊळ, चंदन धुरी, प्रवीण देसाई यांनी चर्चा केली. मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांना यावेळी करण्यात आले.












