कुडाळ तहसीलच्या दाखले शिबिरात ३ दिवसात १८३ अर्ज

कुडाळ : प्रतिनिधी
शाळा, कॉलेजसह विविध संस्थांनचे प्रवेश सुरू असल्यामुळे विद्यार्थी, पालक दाखल्यांसाठी तालुकास्तरावरील तहसिल कार्यालयात धावपळ करत होते ,याची दखल घेत कुडाळ तहसिलदार विरसींग वसावे यांनी त्या – त्या विभागातील मध्यवर्ती ठिकाणी “तात्काळ दाखले शिबिर” घेवून दाखले देण्याचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाची सुरूवात माणगांव ग्रामपंचायत मधून करण्यात आली. त्यानंतर कडावल ग्रामपंचायत व नेरूर – देवूळवाडा ग्रामपंचायत येथे हा उपक्रम घेण्यात आला. तिन्ही ठिकाणच्या या दाखले शिबिरात 183 जणांनी दाखल्यासाठी अर्ज दाखल केले.यावेळी तात्काळ दाखले मंजूर करून प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना दाखले देण्यात आले.या शिबिरांना विद्यार्थी व नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. एकुणच हा उपक्रम या पुढेही अशाच प्रकारे राबवावा जेणेकरून ग्रामीण भागातील शाळकरी मुले व नागरीकांची होणारी गैरसोय टळेल अशी अपेक्षा सरपंच व गावातील प्रमुख सुज्ञ नागरीकांनी व्यक्त केली. दरम्यान नागरीकांच्या सेवेसाठी असे उपक्रम यापुढेही घेतले जातील अशी ग्वाही श्री. वसावे यांनी दिली.

उन्हाळी सुट्टी संपून शाळा व कॉलेज सह विविध संस्थानचे प्रवेश सूरू झाल्यामूळे विद्यार्थी पालक दाखल्यांसाठी धावपळ करत असल्याचे कुडाळ तहसिलदार विरसींग वसावे यांच्या निर्दशनास आले. कुडाळ तहसिल येथे तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांची दाखल्यांसाठी गर्दी होत होती. खरं तर प्रत्येक विभागात आपले सरकार सेवा केंद्र आहेत. असे असताना विद्यार्थी तालुक्याला दाखल्यांसाठी गर्दी का करतात? याची माहिती घेतली असता तालुका पातळीवरील तहसिल कार्यालयात तात्काळ दाखले मिळतात या अपेक्षेने विद्यार्थी व पालक तहसिल कार्यालयात गर्दी करतात हे लक्षात आले. पण दाखल्यांसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांच्या धावपळीत त्यांचा वेळ व पैसाही अधिक खर्च होतो. ग्रामीण भागातील त्या विद्यार्थी व पालकांना आर्थिक भुदंड होवू नये यासाठी त्या – त्या विभागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भागांमध्ये दाखले शिबीर उपक्रम घेण्याचे तहसिलदार श्री.वसावे यांनी नियोजन केले. त्यासाठी त्यांनी त्या – त्या विभागातून आपल्या यंत्रणेमधील मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांना हि शिबीरे यशस्वी करण्याचे आदेश दिले. त्यानूसार त्या विभागातील आपले सरकार केंद्र चालक व महसुलची यंत्रणा अ‍ॅक्टिव झाली व त्या सर्वांनी एकत्रित टिम वर्क करत माणगांव ग्रामपंचायत, कडावल ग्रामपचायंत व नेरूर – देवूळवाडा ग्रामपंचायत येथे दाखले शिबीर घेवून नागरीक व विद्यार्थ्यांना चांगली सेवा दिली. या शिबीरा दरम्यान तहसिलदार विरसींग वसावे यांनी स्वतः तिन्ही शिबीरांना प्रत्यक्ष भेट देवून स्वतः दाखले मंजुर करून प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना वितरीत केले. दरम्यान शिबीराच्या पुढील दोन दिवसात उर्वरीत दाखले मंजुर करून देण्यात आले असून लाभार्थ्यांनी त्या – त्या केंद्रातून दाखले स्विकारावेत असे आवाहन तहसिलदार श्री.वसावे यांनी केले आहे. कुडाळ तहसिलदार श्री.वसावे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यातील विद्यार्थी, नागरीकांमधून खास कौतुक होत आहे.

नेरूर शिबीरात सर्वांधिक 95 दाखल्यांसाठी अर्ज
कुडाळ तहसिलच्या या दाखले शिबीरात गुरूवारी माणगांव ग्रा.पं.येथे 53 दाखल्यांसाठी अर्ज दाखल झाले. कडावल ग्रा.पं.येथे 35 तर नेरूर देवूळवाडा ग्रा.पं.येथील शिबीरात 95 दाखल्यांसाठी अर्ज दाखल झाले. तिन्ही ठिकाणच्या या शिबीरात तात्काळ दाखले मंजुर करून प्रातिनिधीक स्वरूपात तहसिलदार विरसींग वसावे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. माणगांव व कडावल मधील शिबीरातील बहुतांशी सर्व दाखले मंजुर केले असून लाभार्थ्यांनी दोन दिवसात त्या – त्या केंद्रात जावून ते दाखले स्विकारावेत तसेच नेरूर देवूळवाडा येथील शिबीरातील दाखले येत्या दोन दिवसात मंजुर होताच लाभार्थ्यांनी दाखले स्विकारावेत असे आवाहन तहसिलदार विरसींग वसावे यांनी केले आहे.