उबाठा सेना नव्या चेहऱ्याच्या शोधात
विशेष प्रतिनिधी (कुडाळ)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील कुडाळ-मालवण या विधानसभा मतदारसंघात आ.वैभव नाईक यांना धोक्याचा इशारा देताना भाजपा नेते निलेश राणे यांच्यासाठी या मतदारसंघातील जनतेने ग्रीन सिग्नल दिला आहे. यात विशेष म्हणजे ज्या कुडाळ शहराच्या नगरपंचायतhमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असतानाही कुडाळ शहरातील जनतेने तब्बल १८०० हून अधिक मताधिक्य देऊन निलेश राणे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. कुडाळ-मालवण मतदार संघात शिवसेना मतदानात मायनस झाल्याने आ. वैभव नाईक यांनाच हा मोठा धक्का मानला जात असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतून कुडाळ-मालवण मतदारसंघात नव्या चेहऱ्याचा विचार केला जाऊ शकतो. सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत या नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात २६,८०० मताधिक्य मिळाले आहे. खासदार नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल मताधिक्य मिळाले आहे. त्यातही ज्या कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्याच कुडाळ नगरपंचायत हद्दीत भाजपाचे खा.नारायण राणे यांना मताधिक्य मिळाल्याने महाविकास आघाडीचे आ.वैभव नाईक आणि नगरपंचायतीचे नगरसेवक यांना आगामी निवडणुकीतील पराभव स्पष्ट दिसू लागला आहे.
कुडाळ शहरातील जनतेने खा.नारायण राणे यांना मताधिक्य देतानाच भाजपा नेते निलेश राणे यांना निवडणुकीत ग्रीन सिग्नल दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आ.वैभव नाईक यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून कोणी नवीन चेहरा या मतदार संघात उतरवता येईल का? याची चाचपणी केली जात आहे. विद्यमान आ.वैभव नाईक या विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यास उत्सुक असले तरीही त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात असून तशी चर्चाही सेनेच्या वर्तुळात होत आहे.
दरम्यान कुडाळ-मालवण मतदार संघात भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झालेली विकासकामे यामुळे कुडाळ शहरासह मतदार संघात लोकसभा निवडणुकीत मोठं मताधिक्य मिळण्यास मदत होऊ शकली.











