खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे थैमानच सुरू आहे. आठवडाभरापूर्वी धुमाकूळ घातलेल्या पावसाचा तालुक्याला ५ लाख ४५ हजारांचा तडाखा बसला आहे. घरांसह गोठ्यांच्या पडझडीचा समावेश असून मोठी हानी झाली आहे. येथील महसूलकडून पंचनाम्यांचे कामही हाती घेण्यात आले आहे. गेले आठवडाभर थैमान घालणाऱ्या पावसाने गेल्या २ दिवसांपासून काही अंशी उघडीप घेतल्याने दिलासा मिळाला आहे.
खेड तालुक्यातील सोनगाव-भोईवाडी येथील दिलीप दिवेकर व पुष्पा महादेव पारधी यांची घरे जमीनदोस्त होवून १ लाख ३७ हजार रूपयांच्या नुकसानीची नोंद केली आहे. खोपी- ‘रामजीवाडी येथील विठ्ठल बाळू बर्गे यांच्या घराचे ३ हजार रूपये अंशतः नुकसान झाले. तुळशी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे २५ हजार रूपये, नांदिवली येथील काशिनाथ गणपत कदम यांच्या घराचे१६ हजार ८०० रू. व मांडवे येथील लक्ष्मण भागोजी डोईफोडे यांच्या गुरांच्या गोठ्याच्या आगीत १७ हजार रू. नुकसान झाले. कसबा नातू येथीलकाशिराम चंद्रकांत रांगडे यांच्या घराचे ५ हजार रूपये, घाणेखुखुंट जि. प. शाळेच्या संरक्षक भिंतीचे १० हजार रूपये, खाडीपट्ट्यातील राजवेल साई मंदिराच्या संरक्षक भिंतीचे २० हजार रूपयांचे नुकसान झाले. पुरे खुर्द येथील अनंत परशुराम जाधव यांच्या गुरांच्या गोठ्याचे १८ हजार ५०० रूपये, शिंगरी येथील तेजश्री तुळशीराम चव्हाण यांच्या घराचे १३ हजार ६६५ रूपयांची हानी झाली. दहिवली नळपाणी योजनेची साठवण टाकी कोसळून ५५ हजार रूपये, खाडीपट्ट्यातील कर्जी येथील रामचंद्र बाबू लोंढे यांच्या गुरांच्या गोठ्याचे २९०० रूपये, नातूनगर येथील लक्ष्मीबाई रामचंद्र शिंदे यांचे घर कोसळून १ लाख ८८ हजार २०० रूपये, नांदिवली येथील नळपाणी योजनेची विहीर कोसळून १५ हजार रूपये अशी एकूण तालुक्यात ५ लाख ४५ हजार १६५ रूपयांची हानी झाली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांचे व शासकीय मालमत्तेचेही नुकसान झाले. या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम महसूलकडून हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.









