वीर जवानांप्रती समाजात कृतज्ञता कायम राहणे आवश्यक : सुरेश प्रभू

वीर पत्नी सरस्वतीबाई राजगे यांचा विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे सन्मान

जन शिक्षण संस्थान एनसीसीच्या तरुणांना सोबत घेऊन करणार काम

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारत-पाक युद्धाला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, सैन्य दलात प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या जवानांच्या स्मृती विस्मरणात जाऊ नयेत तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता कायम राहणे आवश्यक आहे.

समाजाच्या शब्दकोशातून कृतज्ञता हा शब्द आज दुर्मिळ होत चालला आहे. अशा वेळी वीरगती प्राप्त झालेल्या बाबली राजगे यांच्या पत्नी सरस्वतीबाई राजगे आणि कुटुंबीयांचा समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनने आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजात जागृती करणारा ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

दरम्यान, सामाजिक बांधिलकी जोपासून येथील विनायक दळवी ट्रस्टच्या माध्यमातून वीर पत्नी सरस्वती राजगे यांचा केलेला सत्कार ही कौतुकाची बाब आहे. त्यावेळी जरी त्यांना दुःख झाले असले तरी आज आपला सत्कार होतोय हे पाहून आनंद झाला असेल. हे सातत्य पुढे राखून सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा योग्य तो सन्मान व्हावा. जन शिक्षण संस्थान एनसीसीच्या तरुणांना बरोबर घेऊन काम करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय, विनायक दळवी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भारत-पाक युद्धात वीरमरण आलेल्या बाबली राजगे यांच्या पत्नी सरस्वती राजगे यांचा त्यांच्या ८८ व्या वाढदिवसादिवशी सन्मान करण्यात आला.यावेळी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने एन सी सी,एन एस एस, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात वीरनारी सरस्वतीबाई राजगे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करत शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व  मुंबई विद्यापीठाचे सिनेट मेंबर युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच मुलगा सुर्यकांत राजगे यांनाही सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीरगती प्राप्त झालेल्या बाबली राजगे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच जनशिक्षण संस्थनचे अध्यक्षपदी मोहन होडावडेकर यांची निवड झाल्याबद्दल सुरेश प्रभू व सौ उमा प्रभू यांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ दिलीप भारमल व वासीम सय्यद यांनी सत्कार केला.

यावेळी वीरनारी सरस्वतीबाई राजगे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोसले,सौ उमा प्रभू ,मोहन होडावडेकर ,प्राचार्य दिलीप भारमल, कर्नल दीपक दयाळ, सूर्यकांत राजगे, मानसी केळकर , डॉ गणेश मर्गज आदी उपस्थित होते.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोसले म्हणाले, आमच्या कुटुंबाने शैक्षणिक क्षेत्रात अनेक मुलांना आधार देण्याचे काम केले आहे ते असेच पुढे चालू राहतील .विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनने सामाजिक जाणवितेतून उपक्रम सुरू केले आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतानाच वीरगती प्राप्त झालेल्या शहीद हवालदार बाबली राजगे यांना मुजरा आणि त्यांच्या पत्नीना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी जन शिक्षण संस्थांच्या माजी अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांनी तरुणांनी देशासाठी झोपून देऊन काम केले पाहिजे असे सांगितले तर विनायक दळवी फाउंडेशनच्या वतीने विनायक दळवी यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.प्राचार्य दिलीप भारमल यांनी प्रस्तावना केली सूत्रसंचालन डॉ. गणेश मर्गज यांनी केले तर सरस्वतीबाई राजगे कुटुंबीयांतील मिहीर राजगे यांनी कृतज्ञता सोहळा आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.