कणकवली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ६ जुलै रोजी सोलापूर या ठिकाणी महामंडळाचे अध्यक्ष श्री.जे के पाटील (जळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली व आ.श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.महामंडळाच्या अध्यक्षपदी श्री.तानाजी माने(सोलापूर), सचिवपदी श्री.नंदकुमार सागर(पुणे), कोषाध्यक्ष श्री.संदेश राऊत (रत्नागिरी) व श्री वामन तर्फे यांची महामंडळाचे मुखपत्र एज्युकेशनल जर्नल यांच्या संपादकपदी एकमताने निवड झाली.
महामंडळाचे हे प्रमुख पदाधिकारी असून यांचा कालखंड २०२४ ते २०२७ असा याचा कार्यकाळ राहणार आहे.महाराष्ट् एज्युकेशनल जर्नल हे मुख्याध्यापक संघ महामंडळाचे शैक्षणिक आणि संघटनात्मक विचारांचे व्यासपीठ असणारे मासिक असून यामध्ये प्रसिद्ध होणारे विचार आणि लेख यांची शासन स्तरावर शैक्षणिक धोरण ठरवताना प्रामुख्याने दखल घेतली जाते.अशा या शैक्षणिक व्यासपीठाचे संपादक होण्याचा बहुमान त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता.मालवण या प्रशालेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक महामंडळाचे निष्ठावान कार्यकर्ते श्री.वामन तर्फे यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.या निवडीमुळे श्री.वामन तर्फे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.आपल्याला मिळालेले प्रतिष्ठेचे पद हे जिल्ह्यातील मुख्याध्यापक बंधु-भगिनींचा सन्मान असून याचे श्रेय जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना आहे असे मत श्री.वामन तर्फे यांनी व्यक्त केले.











