चिपळूनात मुसळधार! वाशिष्ठी-शिवनदी तसेच ग्रामीण भागातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली!

चिपळूण (प्रतिनिधी):– चिपळूण शहरासह ग्रामीण भागात रविवारी दुपारपासून पावसाने चांगलाच जोर धरला. या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठीसह शिवनदी तसेच ग्रामीण भागातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.

चिपळूण शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वाशिष्टी नदी तसेच ग्रामीण भागातील नद्यांच्या पाण्याच्या पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. काडवली – निरबाडे मार्गावरी पुलाला पाणी टेकण्यास काही अंतर राहिल्याचे पहावयास मिळाले. वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बहादूरशेखनाका येथील नदी दुथडी भरून वाहत होती.

तर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी ७ः०० वा वाशिष्ठी नदीची नाईक पुलाजवळील पाणी पातळी ही ४.२ मी. असून इशारा सातत्याने पाऊस पडल्यास इशारा पातळीजवळ पाणी पोहोचू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३३.२५ मी. म्हणजेच खालच्या पातळीवर आहे. ७ वा कोळकेवाडी धरणाच्या सर्व मशिन बंद केल्या आहेत. संध्याकाळी ८ः१० वा ओहोटी आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. फक्त मुसळधार पाऊस असल्याने नागरिकांनी अति कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र, रविवारी संध्याकाळीदेखील पावसाचा जोर असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तर दुसरीकडे चिपळूण शहरात नेहमीप्रमाणे अनंत आईस फॅक्टरी समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने प्रशासनाने या मार्गावरील काही वेळ वाहतूक बंद ठेवली. तसेच मिरजोळी, मुंबई गोवा महामार्गावरील डीबीजे महाविद्यालय समोरील, वालोपे ते फरशी मार्गावरील मारुती शोरूम जवळ रस्त्यावर पाणी साचले यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कालुस्ते घाटातील दरडीच्या मातीचे पाणी रस्त्यावर आल्याने या मार्गावरील देखील वाहन चालक त्रस्त झाले. पावसाचा जोर पाहता प्रशासनाने एनडीआरएफ
च्या टीम सज्ज ठेवल्या आहेत.