पुरामुळे अडकलेली झाडे व कचरा सा. बां विभागाने हटवत पुलाची केली साफसफाई
वैभववाडी प्रतिनिधी
पुरात जामदा पुलावर अडकलेली झाडे व कचरा सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवून बाजूला केला आहे. त्यामुळे तिथवली येथील जामदा पुलाने आता मोकळा श्वास घेतला आहे.
रविवारी वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या तिथवलीतील जामदा पुलाला बसला होता. जामदा पूल पुरात पाण्याखाली गेले होते. पुरातून वाहत आलेली झाडे व कचरा जामदा पुलावर मोठ्या प्रमाणात अडकून पडला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने अडकलेली सर्व झाडे व कचरा बाजूला करत साफसफाई केली आहे.
सदर जामदा पूल हे धोकादायक स्थितीत आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. या ठिकाणी नवीन पूल होणे देखील फार गरजेचे असल्याचे स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांमधून बोलले जात आहे.










