स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अन्न व औषध प्रशासन यांची संयुक्त कारवाई
रत्नागिरी : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अन्न व औषध प्रशासन यांनी रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील निवळी फाटा येथे संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत 8 लाख 4 हजार रुपयांचा गुटखा 7 लाख 25 हजार रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण 15 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी सकाळी 8.30 वा. करण्यात आली असून गुटखा मालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.


गुटखा मालक संकेत शिवाजी चव्हाण (30,रा.फणसोप सडा,रत्नागिरी), चालक विशाल बळवंत घोरपडे (32,रा.फणसोप सडा,रत्नागिरी) आणि सुरज राजू साळुंखे (33, रा.धायरी,पूणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.स्थानिक गुन्हा शाखेला निवळी फाटा येथील एका गोडावूनमधून गुटख्याची गाडी बाहेर पडणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार,त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकांसह त्याठिकाणी सापळा लावला होता.
स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक जनार्दन परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे, सुभाष भांगणे, बाळू पालकर, विनोद कदम, योगेश शेट्ये, अतुल कांबळे,प्रविण खांबे या पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनचे निरीक्षक विजय पाचुपते तिथे होते. गुटखा भरलेली बोलेरो सकाळी 8.30 वा.च्या सुमारास निवळी फाटा येथे आली असता ती थांबवण्यात आली. बोलेरोच्या हौद्यात तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा मिळून आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यं ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सूरु होती.












