महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘महाकवी कालिदास दिन’ साजरा

 

गुहागर l प्रतिनिधी :येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातर्फे ‘महाकवी कालिदास दिन’ साजरा करण्यात आला. *”आषाढस्य प्रथम दिवसे”* म्हटल्यावर डोळ्यांसमोर नाव येतं ते महाकवी कालिदास यांचं. आषाढ महिन्यातील शुद्ध प्रतिपदा हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाने हा दिन अभिनव पद्धतीने साजरा केला.

 

सायंकाळी ४ वाजता महाविद्यालयातील कॉम्प्युटर सेंटर इथे महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी एकत्र जमले. कार्यक्रमाची सुरुवात झाली ती ‘शाकुंतल’ नाटकातील *”पंचतुंडनररुंडमालधर”* या नांदीने. थोर नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं ‘शाकुंतल’ हे संगीत नाटक म्हणजे महाकवी कालिदासाच्या *’अभिज्ञान शाकुन्तलम्’* चेच मराठी भाषांतर असल्यामुळे या नाटकातल्या या सर्वश्रुत नांदीने कार्यक्रमाची मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ. प्रिती साठे भोळे, सौ. गौरी जोशी आणि मीनल साठे यांनी एकत्र ही नांदी गायली.

 

यानंतर महाकवी कालिदासाच्या संपूर्ण जीवनावर एक संक्षिप्त दृष्टिक्षेप टाकण्यासाठी प्राध्यापिका मीनल साठे आणि सौ. प्रिती साठे यांनी कालिदासाच्या एकूणच जीवनपटाची संक्षिप्त माहिती असलेल्या लेखांचे वाचन केले. त्यांच्या वाचनानंतर महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. श्री. गणेश दिवे सर यांनी महाकवी कालिदासाची एक इंग्रजीत अनुवादित असलेली कविता सर्वांना आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीत उलगडून दाखवली. या काव्यवाचनाने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली.

 

यानंतर महाविद्यालयातील ‘दूरसंचार आणि अणुविद्युत अभियांत्रिकी’ विभागाच्या प्राध्यापिका सौ. गौरी गोडबोले जोशी यांनीही उत्तम काव्यवाचन केले आणि कार्यक्रमावर रंजकतेचा साज चढवला.

 

कार्यक्रमाच्या शेवटी दूरदर्शनवर नव्वदच्या दशकांत लागणाऱ्या *’भारत एक खोज’* कार्यक्रमातील ‘महाकवी कालिदासाला’ समर्पित केलेल्या दोन भागांमधील दोन पदे ऐकवली गेली. ही पदे म्हणजे महाकवी कालिदासाच्या संस्कृत काव्यांचे हिंदी अनुवाद आहेत. प्रसिद्ध शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायक श्री. अजितकुमार कडकडे यांच्या आवाजातील ही दोन पदे ऐकताना सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते.

 

या पदांनंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख तथा विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक श्री. योगेश काटदरे यांनी केले.

 

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीततेकरिता विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर सर, तसेच महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी सर, उपप्राचार्य श्री. अविनाश पवार सर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.