गाडी खरेदी करण्‍याच्‍या दोन वर्ष आधीच दंड

पिंपरी- काळेवाडीत राहणार्‍या एका तरुणाने गेल्‍यावर्षी म्‍हणजे २०२३ मध्‍ये नवीन दुचाकी बारामती येथील आपल्‍या गावी खरेदी केली. शोरूममधून खरेदी केलेल्‍या या नवीन गाडीवर दोन वर्षांपूर्वीचा नो पार्किंगचा मुंबईत दंड करण्‍यात आला. आता हा दंड भरण्‍यासाठी त्‍या तरुणाला लोक अदालतीचे समन्‍स आले आहे. या प्रकारामुळे तो तरुण अक्षरशः चक्रावून गेला आहे.

याबाबत सविस्‍तर माहिती अशी की, कामानिमित्‍त काळेवाडी येथे राहणारे उद्धव अशोक बुरूंगले यांचे मूळगाव पुणे जिल्‍ह्यातील दौंड तालुक्‍यातील खडकी हे आहे. जन्‍मगाव खडकी असल्‍याने त्‍यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड व इतर सर्व कागदपत्र मूळ गावच्‍या पत्‍त्‍यावर खडकी येथील आहे. सध्‍या पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे ते आपल्‍या कुटुंबासह राहतात. त्‍यांनी ७ एप्रिल २०२३ रोजी आपल्‍या गावच्‍या पत्‍त्‍यावर एक दुचाकी (एमएच ४२ बीके २११०) खरेदी केली. नुकतेच बुरूंगले यांना लोक अदालतमध्‍ये हजर राहण्‍याबाबत ३ जुलै रोजी पत्र प्राप्‍त झाले. या पत्रामध्‍ये ३० नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये मुंबईतील कांजूरमार्ग येथे आपले वाहन नो पार्किंगमध्‍ये उभे केल्‍याबाबत दंड आकारण्‍यात आला असून हा दंड न भरल्‍यामुळे लोक अदालतीचे पत्र आले आहे.

मुळातच बुरूंगले यांनी ७ नोव्‍हेंबर २०२३ रोजी शोरूममधून नवीन गाडी खरेदी केली असताना गाडी खरेदीच्‍या अगोदर दोन वर्ष ते नो पार्किंगचा भंग कसा करतील. विशेष म्‍हणजे बुरूंगले हे गाडी घेतल्‍यापासून एकदाही दुचाकी घेऊन मुंबईला गेले नाहीत. वाहतूक पोलिसांच्‍या या अजब कारभाराची चर्चा पिंपरी चिंचवड शहरात रंगू लागली आहे. याबाबत वाहतूक पोलिसांशी संपर्क केला असता दंड हा मुंबईत केला असल्‍याने आपण याबाबत काही बोलू शकत नाही. लोक अदालतमध्‍ये गेल्‍यावर कागदपत्र पाहून दंड रद्‌द केला जाईल.