मसूरे | झुंजार पेडणेकर : अगदी दोन दिवसावर आलेली आषाढी एकादशी आणि त्या निमित्ताने पंढरीच्या वाटेवर संतांच्या मानाच्या पालख्या विठू नावाचा गजर करत निघाल्या आहेत. सर्वत्र पांडुरंगाच्या भेटीचे भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. याच आषाढी एकादशीचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता दहावी मध्ये शिकणारी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने मेहंदीच्या सहाय्याने कागदावर विठुराया, रखुमाई आणि वारकऱ्यांचे अप्रतिम चित्र साकारले आहे.
हे चित्र साकारण्यासाठी तिला तीन तासांचा कालावधी लागला. हातांवर विविध अलंकारिक आकारांची कलाकुसर साधत एका सुंदर कलाकृतीला आकार देते ती मेहंदी!
आपल्या जीवनातील अनेक आनंददायी क्षणांची ती साक्ष असते. एखाद्या नववधूसाठी नव्या विश्वात घेऊन जाणारी सोबती असते.तासनतास बसून हातांवर पायांवर होणारे ते अलंकरण पाहणे मनमोहक असतं. पण हीच मेहंदी जेव्हा विठुराया, रखुमाई आणि वारकरी यांच्या रूपात कागदावर एका सुंदर कलाकृतीला जन्म देते तेव्हा पाहणाऱ्याचे हात आपोआपच जोडले जातात. श्रेया या शाळकरी मुलीने काढलेल्या या कलाकृतीसाठी सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.












