मळगांव कुंभार्लीत विद्युतदाब वाढल्यामुळे उपकरणे जळाली

हजारोंचे नुकसान : तलाठ्यांकडून पंचनामा

नुकसान भरपाई देण्याची मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगांव कुंभार्ली भागातील रस्तावाडा तसेच तेलकाटा परिसरात गुरुवारी रात्री अचानकपणे विद्युत दाब वाढल्याने अनेक जणांची वीजेची उपकरणे जळाली. टीव्ही, फ्रीज, मिक्सर, बल्ब अशी उपकरणे जळाल्याने ग्राहकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत महावितरण विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.

कुंभार्ली भागात गुरुवारी रात्री अचानक वीजेचा दाब वाढला. त्यामुळे या भागातील ग्राहकांची वीजेची उपकरणं जळाली. याबाबत मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर यांना स्थानिकांनी सांगितल्यानंतर त्यांनी महावितरणचे शाखा अभियंता लोहार यांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक तलाठ्यांकरवी नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.

या नुकसानीत सुरेश सहदेव राऊळ २ फॅन व चार्जर मिळून ५२०० रुपये, संदेश सोनुर्लेकर २ फॅन व बल्ब ९५००, ३ फॅन व फ्रीज मिळून २३ हजार, आत्माराम राऊळ १ फॅन, फ्रीज व गीझर मिळून ३० हजार, महेश खानोलकर २ इनव्हर्टर ४४ हजार, सुजेश श्री २ मोठे फ्रीज १ लाख ९२ हजार, रुक्मीणी नाईक १ मिक्सर ३ फॅन १८ हजार, उल्हास नार्वेकर १ टिव्ही १ फॅन ४५ हजार, प्रसाद नार्वेकर होम थिएटर २५ हजार, संजय तांडेल २ वजन काटे ८५ हजार, संजय धुरी १ टिव्ही व मिक्सर १९ हजार, सुनिल सोनुर्लेकर १ फॅन २२००, संतोष गावडे २ फ्रीज २ फॅन व टिव्ही मिळून ५० हजार, वसंत ठाकूर १ फ्रीज १५ हजार, दत्ताराम राणे १ फॅन १५००, आनंद देवळी २ फॅन, २ टेबल फॅन व फ्रीज १९ हजार, रामचंद्र देवळी फ्रीज २ फॅन, टेबल फॅन १९ हजार, संगणक संच १८ हजार ३००, नेहा सावंत १ मॉनिटर व टेबल फॅन १५ हजार, मारुती सावंत टीव्ही व फॅन १२, ५००, गजानन सावंत टीव्ही व फॅन १२,५०० व कृष्णा सावंत स्टडी लाईट व टिव्ही १२,५०० यांसह आणखीही काही ग्राहकांची विद्युत उपकरणे जळाली आहेत.

याबाबत महावितरणचे शाखा अभियंता लोहार यांना संपर्क केला असता त्यांनी नुकसानीचा तलाठ्यांनी पंचनामा केला असून त्याला महावितरणचा अहवाल जोडून तो वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल अशी माहिती दिली. विद्युत पुरवठा होत असताना न्यूट्रल खंडित झाल्याने अचानक दाब वाढला व त्यामुळे उपकरणे जळाली असावीत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.