शेकडो लाभार्थ्यांना जागेवरच दाखल्यांचे वाटप
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा पहिला टप्पा निरवडे येथे उत्साहात पार पडला. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिरात निरवडे मंडळातील आठ गावांमधील शेकडो नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि योजनांच्या लाभाचे थेट वाटप करण्यात आले.
“सामान्य जनतेची कामे जलद व्हावीत आणि त्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे,” असे प्रतिपादन आमदार केसरकर यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
या शिबिरात निरवडे, सोनुर्ली, मळगाव, ब्राह्मणपाट, तळवडे, कुंभारवाडा, बादा आणि नेमळे या गावांमधील नागरिकांनी लाभ घेतला. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एकाच दिवसात ३३३ शेतकरी दाखले, १४८ प्रलंबित फेरफार नोंदी, ५८ उत्पन्न दाखले, १९ सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, १३ जातीचे दाखले, ११ अल्पभूधारक दाखले, ८ रेशन कार्ड, ६ अधिवास दाखले आणि एका लक्ष्मी मुक्ती योजनेच्या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी नोडल अधिकारी वनिता पाटील पवार, सभापती सुस्मिता जाधव, तहसीलदार श्रीधर पाटील, मंडळ अधिकारी सुधीर नलावडे यांच्यासह आठही गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि पोलीस पाटील उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात प्रलंबित कामांचा निपटारा झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष कष्ट घेतले.













