बांदेवाडी ते हुर्शी दरम्यानच्या वटवृक्षामुळे वाहन धारकांना धोका.

 

विजयदुर्ग (प्रतिनिधी) विजयदुर्ग ते पडेल कॅन्टीन दरम्यान बांदेवाडी ते हुर्शी या ठिकाणी तरळे विजयदुर्ग मुख्य रस्त्यावर वटवृक्षांची मोठी झाडे असून त्यांच्या फांद्या रस्त्यावर येत असल्याने वाहन धारकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता आहे.

 

विजयदुर्ग हे शासन मान्य पर्यटन क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. देश विदेशातून हजारो पर्यटक आपली वाहने घेऊन विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी वर्षभर येत असतात. विजयदुर्ग किल्ले या व्यतिरिक्त विजयदुर्ग चौपाटी, धुळपवाडा, आरमारी गोदी, गिर्ये बीच ही पर्यटन स्थळे या भागात असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र बांदेवाडी ते हुर्शी यादरम्यान मोठमोठे वटवृक्ष या मुख्य रस्त्यानजिक असल्याने त्यांच्या रस्त्यावर आलेल्या फांद्यांची वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होते. याचबरोबर वीज महामंडळाची उच्च दाब वाहिनी याच रस्त्याने गेलेली आहे.

 

 

सध्या पावसाचा जोर वाढल्याने झाडे रस्त्यावर उखळून पडत आहेत. त्यामुळे रहदारी ठप्प होऊन वाहनधारकांना ताटकळत रहावं लागतं. अनेक वेळा त्या त्या खात्याची माणसं नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. याहीपूर्वी मोठे वटवृक्ष उन्मळून पडल्याने वाहनधारक आणि जनतेला त्रास सहन करावा लागला होता. तरी संबंधित खात्याने दखल घेऊन रस्त्यानजिक असलेले वटवृक्ष तोडण्यात यावेत किंवा रस्त्यावर आलेल्या वटवृक्षाच्या मोठमोठ्या फांद्या छाटण्यात याव्यात याची बांधकाम विभागाने दखल घ्यावी अशी मोठी मागणी आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दिलदार चौगुले यांनी वन अधिकारी, उप वन विभाग यांच्याकडे लेखी पत्र देऊन यासंदर्भातील समस्येवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.