शिक्षण प्रसारक मंडळ व राणी पार्वती देवी हायस्कूलतर्फे विक्रांत सावंत यांचा भव्य सत्कार
सावंतवाडी | प्रतिनिधी : विक्रांत सावंत यांचा स्वभाव आणि समाजाप्रती असलेला आदर त्यांची प्रगती निश्चितच करेल. आज कै. विकास सावंत उपस्थित असते तर त्यांना या सत्काराचा मोठा आनंद झाला असता. विक्रांत यांच्यात मोठे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांनी मोठी स्वप्ने पहावीत. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत मजल मारावी, त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, अशा शब्दांत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
माजगाव मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक २०२६ मध्ये विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन शिक्षण व कृषी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष अभिनंदन कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही. बी. नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक, चंद्रकांत सावंत, अमोल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
*वारसा समर्थपणे चालवा : बबन साळगावकर*
विक्रांत सावंत यांना शुभेच्छा देताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले की, “कै. भाईसाहेब सावंत आणि कै. विकास सावंत यांचा मोठा वारसा विक्रांत सावंत यांना लाभला आहे. कै. अजित पवार यांच्या कामाचा धडाका आणि जनसामान्यांसाठी असलेली तळमळ डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कार्य करावे. पुढच्या वेळी प्रचाराला जाण्याची गरज भासणार नाही, इतके उत्तम काम त्यांच्या हातून घडावे, अशा शब्दात त्यांनी विक्रांत सावंत यांचे कौतुक केले.
*पदाचा उपयोग जनसामान्यांसाठीच : विक्रांत सावंत*
सत्काराला उत्तर देताना विक्रांत सावंत भावूक झाले. ते म्हणाले, “हा विजय म्हणजे ज्येष्ठांचे आशीर्वाद, मतदारांचे प्रेम आणि कुटुंबाची पुण्याई आहे. मला मिळालेल्या पदाचा उपयोग मी केवळ आणि केवळ जनसामान्यांच्या कल्याणासाठीच करेन,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमात प्रा. रूपेश पाटील यांनी विक्रांत सावंत यांची प्रकट मुलाखत घेतली, ज्यातून त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचे पैलू उलगडले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संप्रवी कशाळीकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांनी केले.
सोहळ्याला सोनाली सावंत, के. टी. परब, नारायण देवरकर, वसुधा मुळीक, सीमा मठकर, नामदेव मुठे, जगदीश धोंड, मेघश्याम काजरेकर, अर्चना सावंत यांच्यासह संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अमोल सावंत, वसुधा मुळीक, प्रा. केदार म्हसकर, दशरथ शृंगारे यांनीही आपली मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.












