बांबू लागवडीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाला चालना ; मंडणगड पंचायत समितीचा पुढाकार –

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील 12 हजार 456 बांबूच्या रोपांचे वाटप –

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबूशेती करिता पंचायत समितीच्या माध्यामतून बांबूची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीला बांबूच्या शेतीचा नवीन पर्याय उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांना आर्थिकदुष्ठ्या सक्षम होण्यास चालना मिळणार आहे.

 

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंडणगड मधील 27 लाभार्थींना सुमारे 12 हजार 456 बांबूच्या रोपांचे पंचायत समितीच्या माध्यमातून वाटप करण्यात आले. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात सुमारे 11.32 हेक्टर क्षेत्र बांबू लागवडीखाली येणार आहे. बांबू लागवडीमुळे जमिनीची धूप न होण्यास मदत होते त्यामुळे भूस्खलन होत नाही. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यास बांबूची शेती मदत करते. व्यावसाईकदृष्ट्या बांबू शेतीतून चौथ्या वर्षापासून शेतकऱ्यांना वर्षाला सरासरी 50 हजार ते 75 हजार उत्पन्न मिळू शकते. फळबाग लागवडीला वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसान याला एक उत्तम पर्याय म्हणून बांबू लागवडीपासून आर्थिक फायदा होऊ शकतो.

 

 

मॅग्रारोहयो अंतर्गत सदर बांबू लागवडीसाठी तीन वर्षाकरिता हेक्टरी 58 हजार 200 रुपये अनुदान दिले जाते. बांबू लागवडीसाठी असलेल्या या योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही गटविकास अधिकारी विशाल जाधव यांनी केले आहे.
यासंदर्भात नुकतेच पंचायत समितीने तालुक्यातील शेतकऱ्यांना बांबूच्या रोपांचे वाटप केले. यावेळी बांबूच्या लागवडीसंदर्भात प्राथमिक माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल जाधव, कृषी विस्तार अधिकारी पी. डी. गोसावी, तांत्रिक सहाय्यक मॅग्रारोहयो सचिन भोसले, भावेश कारेकर व लाभार्थी उपस्थित होते.

मंडणगड तालुक्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान व टुल्डा नवीन बांबू प्रजातीचा वापर करून शेतीमध्ये नवीन प्रयोग करीत आहेत. ही बाब कौतुकास्पद असून मॅग्रा रोहयो व कृषी विभागाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.
– विशाल जाधव, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मंडणगड.