जमीन वाटपा संदर्भातील वेळकाढूपणामुळे गेळेवासीयांवर अन्याय : राजन तेली

झारीतील शुक्राचार्य कोण याचा तपास करावा

महावितरणच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार

सावंतवाडी । प्रतिनिधी :
गेळेवासियांची स्वतःची जागा असूनही त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही स्वरूपातील नुकसानी झाल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. कोणताही प्रकल्प ते राबवू शकत नाहीत. त्यामुळे तेथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांच्या हक्काच्या जमिनी वाटप करण्यासंदर्भात शासन निर्णय होऊन देखील त्याबाबत कार्यवाही होत नाहीय.

त्यामुळे यामागील झारीतील शुक्राचार्य कोण याचा त्यांनी तपास करावा, असा टोला भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार राजन तेली यांनी लगावला सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेळे येथील जमीन वाटपाबाबत यापूर्वीच कॅबिनेटचा निर्णय झाला आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा कॅबिनेटमध्ये नेण्याची गरज नाही. तशी माहिती कोणी देत असेल तर ते चुकीचे आहे.

केवळ आता शासकीय राखीव जागांचा विषय राहिला आहे. त्याबाबत कोण आग्रही आहे हे देखील येथील जनतेला माहिती आहे. त्यामुळे याबाबत अधिक वेळकाढूपणा न करता गेळेवासीयांच्या हक्काच्या जमिनी त्यांना लवकरात लवकर परत कराव्यात अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

सावंतवाडी मतदारसंघात सध्या मोठ्या प्रमाणात विजेची समस्या सुरु आहे. अनेक गावांमध्ये पाच सहा दिवस विज पुरवठा खंडीत झाला आहे. कंत्राटी पद्धतीने कामगार भरती झाल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे. महा वितरणकडे गाड्या तसेच इतर साहित्याची कमतरता असल्यास त्यांनी याबाबत जिल्हा नियोजन बैठकीत माहिती द्यायला हवी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी मागणी करायला हवी होती. पालकमंत्री आवश्यक असलेल्या सर्व निधीची पूर्तता करत असतात. त्यामुळे कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढावा यासाठी नेहमीच आग्रही असतो. शत प्रतिशत भाजप ही पक्षाची नेहमीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातही भाजपचे मजबूत संघटन असल्याने व भाजपची मोठी ताकद असल्याने येथे भाजपचा आमदार असावा अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आमचा पक्ष वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मी सावंतवाडीतच राहतो. मी कोणी चाकरमानी नाही. सर्वसामान्य व छोटा कार्यकर्ता म्हणून तळागाळातील लोकांचे काम करणे हे मी माझे कर्तव्य समजतो आणि मी माझी जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहे. त्यामुळे कोणी मला लहान म्हटले तर मला त्याचा कोणताही कमीपणा नाही. मात्र, प्रत्येकाने आपली जबाबदारी देखील समजून काम करायला हवे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.