श्री देव धुतपापेश्वर मंदिर संवर्धन व सुशोभिकरणाचा रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

राजापूर | वार्ताहर : समस्त राजापूर वासियांचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव धुतपापेश्वर मंदिर संवर्धन व सुशोभिकरण कामाचा शुभारंभ रविवार 23 एप्रिल रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
पुरातन असलेल्या या मंदिराच्या सुशोभिकरण व संवर्धनासाठी राज्य शासनाच्या तिर्थक्षेत्र पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दुपारी 12.15 वाजता होणार आहे.
धूतपापेश्वर मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी 11 कोटी रूपयांचा निधी मंजूर असून मंदिराचे जतन संवर्धन व परिसर विकासाचा बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तीन विभागात कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. यामध्ये मंदिराचा जीर्णोध्दार वा पुर्नबांधकाम करणे, मंदिर रिसरातील पर्यटनाच्या भाविकांच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे व इतर सोयी सुविधा संलग्न कामे करणे आदिंचा समावेश आहे.
मंदिराचा जीर्णोध्दार व पुर्नबांधकाम करणे यासाठी जवळपास अडीच कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर मंदिर परिसराचा जीर्णोध्दार व संवर्धन यासाठी सुमारे सात कोटींचा तरतूद आहे. यामध्ये धुतपापेश्वर मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर भाविकांसाठी आवश्यक दुकान गाळ्यांची बांधणी करणे, मृडानी नदीवरील पुलाचे विद्युतीकरण व सुशोभिकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. पर्यटक व भाविकांच्या दृष्टीने परिसर विकास व सोयीसुविधांतर्गत विश्रामगृह तसेच पसाधनगृहाची पूर्णपणे दुरूस्ती, दत्त मंदिराच्या दर्शनी भागाचे सुशोभिकरण, मंदिर परिसरातील सिमेंट ब्लॉक परसबंदी काढून कातळ दगडात परसबंदी मंदिराच्या प्रवेशद्वारापुढील मार्गाच्या सिमेंट ब्लॉक काढून जांभ्या दगडात परसबंदी करणे आदी कामे प्रस्तावित आहेत. यासाठी सुमारे दोन कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
भूमीपूजन कार्यक्रमाला आमदार डॉ. राजन साळवी, उपविभागीय अधिकारी वैशाली माने, तहसिलदार सौ. शितल जाधव आदी मान्यवर उपस्थीत राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचे आवाहन श्री देव धुतपापेश्वर मंदिर संस्थानचे प्रशासक अजितकुमार थोरात यांनी केले आहे.