मराठवाड्यासाठी रत्नागिरीकरांची हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून मदत मोहीम

रत्नागिरी – मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे गावे पाण्याखाली गेली असून सोलापूर, लातूरसह अनेक ठिकाणच्या नागरिकांवर उपासमारी, विस्थापन आणि हालअपेष्टा ओढावल्या आहेत. या आपत्तीग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी रत्नागिरीतील ‘हेल्पिंग हँड्स’मधील सामाजिक संघटना व संस्था पुन्हा एकत्र आल्या आहेत.

शनिवारी जयेश मंगल कार्यालयात हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध सामाजिक संघटना व व्यावसायिकांच्या संस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांनी बैठकीतच वैयक्तिक आर्थिक मदत जाहीर केली. यावेळी सुमारे दोन लाखांचा निधी संकलित झाला.

हेल्पिंग हँड्सने रत्नागिरीकरांना पुन्हा सहकार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. धान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे तसेच स्वेच्छेने यथाशक्ती योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीला शकील गवाणकर, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, निवृत्त पोलिस अधिकारी शिरीष सासने, राजेश कांबळे, महेश बोराडे, सचिन शिंदे, निलेश मलुष्ठे, चेतन नवरंगे, नंदू चव्हाण, राजू भाटलेकर, वल्लभ वणजू, जयंतीलाल जैन, मरीना डिसोजा, जया डावर, शोभना कांबळे, भूषण बर्वे, अमित काटे, महेश गर्दे, गजानन करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते.