सामाजिक संस्था संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचा दापोलीत शुभारंभ

 

 

दापोली l प्रतिनिधी: ‘समस्या जिथे प्रतिष्ठान तिथे’ या टॅग लाईनवर काम करणारे दापोली-मंडणगड-खेड व रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या सामाजिक जनसंपर्क कार्यालयाचे उद्याटन गोमराई येथील वयोवृद्ध शेतकरी श्री. बाबु जावळे यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. यावेळी संतोष अबगुल प्रतिष्ठानचे सर्वसर्वा संतोष अबगुल, ग्रामीण सदस्य, वयोवृद्ध नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

 

आरोग्य, शिक्षण, रोजगार यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांना आपलेसे वाटणाऱ्या प्रतिष्ठानच्या हक्काचे कार्यालय झाल्याने समस्या निवारण करण्यास सोपे झाले असल्याचे मत उपस्थितीत नागरीकांनी व्यक्त केले.

 

प्रतिष्ठानच्या कार्याचा उल्लेख करतांना आरोग्य क्षेत्रात निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या प्रतिष्ठानच्या 3000 सभासंदाच्या साथीने मुंबईत केईम. जे.जे., नायर, वाडिया, टाटा या असंख्य रुग्णालयात हक्काचे रुग्णसेवक असल्याने गावाकडिल नातेवाईकांचे होणारे हाल कमी झाले आहेत, तसेच या रुग्णालयात मोफत टिफिन सेवा हा उपक्रम सुरु केला व आतापर्यंत १५ लाख रुपयांहून अधिक रुपयांचे जेवण मोफत उपलब्ध करुन देण्यात यश प्रतिष्ठानला मिळाले आहे. लॉकडाऊन काळात १००० पेक्षा जास्त गरजुंना कोणताही फोटो न काढता अन्नधान्य किट वाटप केले गेले. २००० पेक्षा जास्त वाफेच्या मशीन अल्प दरात उपलब्ध केल्या.

 

दापोली व मंडणगड येथील सरकारी रुग्णालय येथे कोरोना रुग्णांना गरम पाणी करण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन मोफत भेट म्हणून दिले गेले आहे. शासकीय दाखले काढून देण्यासाठी, अन्याय होत असलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच विविध शासकीय समस्यांसाठी वेळोवेळी प्रतिष्ठानच्या वतीने मदत, नोव्हेंबर २०२१ पासून आतापर्यंत प्रतिष्ठान व सहकारी आयोजकांच्या मार्फत १०० हुन अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन केलेले असून एकूण 12500 रक्तबॅग जमविण्यात यश आले आहे. दापोली- मंडणगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णांना रक्त मिळण्यास गैरसोय होत होती, ही बाब लक्षात येताच मैत्रेय फाऊंडेशन-सायन यांच्या साथीने प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन भागवत हॉस्पिटल दापोली येथे दापोली तालुक्यातील पहिले मोफत खाजगी ब्लड स्टोअरेज सेंटर एप्रिल २०२२ ला सुरु केले असुन ३००० हून अधिक रक्त बॅग या दापोली, मंडणगड, खेड, गुहागर, चिपळूण व महाड येथील गरोदर भगिनी व रुग्ण यांना उपलब्ध व रिझर्व्ह करून देण्यात यश मिळवले आहे. आपत्कालीन परिस्थितीत सामोरे जाण्याकरीता खास प्रशिक्षण सुमारे 150 लोकांनी घेतले आहे. मुंबई मधील सरकारी तसेच खाजगी हाँस्पिटल मध्ये सुमारे 1250 हुन रुग्णांना ऍडमिड करण्यासाठी 20 रुग्णसेवकांनी हात लावला आहे.

 

महिला भगिनीकरीता गेल्या ३ वर्षात रक्षा बंधन दिवशी ५ विधवा महिलांना लकी ड्रॉ पध्दतीने मेडिक्लेम पॉलिसी, बालक पालक मार्गदर्शन, चिपळूण व खेड तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानबाधित १०० कुटूंबांना माणुसकीची साथ म्हणून लाखभर रुपयांच्या भेटवस्तू या कोणताही फोटो न काढता दिल्या गेल्या तर रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच विविध ट्रस्ट कडून निधी मिळवून देण्यासाठी यश प्राप्त केले गेले आहे. दापोली मंडणगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण ठिकाणी राहणाऱ्या २५ कुटुंबांना (दत्तक) घेतले असून यांना प्रतिमहिना मदत केली जात आहे.

२०१८ पासून म्हाप्रळ व आंबेतला जोडणारा खालीपूल दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेल्या पुलाच्या, दुरुस्तीचे कार्य जलद व्हावे, व नवीन आंबेत खाडीपूल व्हावा म्हणून प्रार्थना दिंडी काढुन जनतेने दिलेली २०,००० हुन अधिक पत्र ही शासनाला दिली गेली आहेत, तसेच निसर्ग चक्रीवादळात नुकसान भरपाई पासून वंचित असलेल्या २५० जास्त लाभार्थीना तहसीलदार दापोली व मंडणगड मधून पाठपुरावा करून १५ ते २५ हजार रुपयांची मदत मिळवून देण्यात प्रतिष्ठान ला यश आले आहे.

 

या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष किशोर कानसे, उपाध्यक्ष दिलीप बांद्रे, कृषि सहाय्यक श्री.म्हात्रे, चंद्रकांत शेडगे, वैभव पाते, निलेश भांबीड, रुपेश कुटरेकर, किसन जाधव, संतोष गावणंग आदी मान्यवर उपस्थित होते.