Olympics 2024 : कोल्हापूरच्या पठ्ठ्याने जग जिंकले!

५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावले कांस्य

भारताला मिळाले तिसरे ऑलिम्पिक पदक

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या सहाव्या दिवशी कोल्हापुरच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर रायफल ३ पोझिशन नेमबाजीत भारताला आणखी एक कांस्यपदक जिंकून दिले आहे.

१९९५ मध्ये महाराष्ट्रातल्या कोल्हापुर येथे जन्मलेला स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये ४५१.४ गुण नोंदवून इतिहास रचला. तसेच खाशाबा जाधवांच्यानंतर स्वप्नील कुसळेने महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे.

भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने मंगळवारी झालेल्या क्वालिफायर फेरीत ५० मीटर रायफल ३ पोझिशन नेमबाजीत एकूण ५९० गुण मिळवून फायनलमध्ये धडक मारली होती. त्याने गुडघ्यावर बसून १९८, झोपून १९७ आणि नंतर उभे राहून १९५ गुण मिळवले. याच स्पर्धेत आणखी एका भारतीय ऐश्वर्या प्रताप सिंगची एकूण धावसंख्या ५८९ होती.