आमदार निरंजन डावखरे हे अभ्यास व्यक्तिमत्व : विकास कामात ते कुठेही कमी पडणार नाहीत
वैभववाडीत आमदार नितेश राणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार ऍड. निरंजन डावखरे यांचा नागरी सत्कार संपन्न
वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा हा साक्षरतेत राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. शिक्षणाला महत्त्व देणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख आहे. कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे यांना सर्वांनी मोठ्या मताधिक्यांनी विजयी केले आहे. श्री. डावखरे हे विकास कामात कुठेही कमी पडणार नाहीत. याची मला पूर्ण खात्री आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राचा कायापालट करणार असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी केले.
वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात कोकण पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांचा भव्य नागरी सत्कार आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नितेश राणे म्हणाले, निवडणूक कोणतीही असो नियोजन कसं करायचं हे प्रमोद रावराणे यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे. नियोजनाचा हा पॅटर्न आपण राज्यात सर्वत्र राबवला तर स्वबळावर भाजपची सत्ता येऊ शकते. पदवीधरच्या मागील निवडणुकीत आम्ही स्वाभिमान पक्षात होतो. कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांनी निरंजन डावखरे यांना मतदान करण्याचे आदेश दिले. आणि जवळपास 99 टक्के मतदान हे निरंजन डावखरे यांना केले.
श्री डावखरे हे ठाण्यात प्रभावीपणे काम करत आहेत. कामात ते कुठेही कमी पडणार नाही. शिक्षण क्षेत्रातील कामे आपण करून घेऊया. डावखरे यांची देखील उद्योग क्षेत्रात चांगली ओळख आहे. सीएसआर व इतर ट्रस्ट च्या मार्फत शिक्षण संस्थांना जास्तीत जास्त निधी ते मिळवून देतील असे सांगितले.
शिक्षण संस्थांची वीज बिल कमी करा, त्यासाठी सोलर पॅनल बसवण्यात यावेत असे यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले. मतदारांच्या अपेक्षा आपण पूर्ण करा यापुढेही तळकोकणातील मतदार आपल्या पाठीशी राहतील असे नितेश राणे यांनी सांगितले.











