कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत व उपाध्यक्ष सुरेश ढवळ यांची टीका
आधी स्वतःच्या गॅस एजन्सी चा कारभार सुधारा नंतर दुसऱ्यांना सल्ले द्या
खताच्या गुणवत्ता तपासून जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करणारच,दिला विश्वास
कणकवली : विधानसभेची उमेदवारी मिळावी आणि उबाठा मध्ये स्वतः काहीतरी केल्याचे भासविण्यासाठी सुशांत नाईक प्रत्येक वेळी बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप करत फिरत आहेत.आपले कर्तुत्व काहीच नाही मात्र प्रसिद्धीसाठी आमदार नितेश राणे यांच्यावर पोरकट टीका करून स्वतः आमदार झाल्यासारखी स्वप्ने पाहत आहेत.एकही शेतकऱ्यांची खताच्या बाबतीत तक्रार नाही असे असले तरी खताच्या गुणवत्तेबाबत जो अहवाल येईल त्यानुसार पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल. परंतु सुशांत नाईक यांनी या साऱ्यात लक्ष घालण्या अगोदर आपल्या स्वतःच्या गॅस एजन्सी मार्फत ग्राहकांना १५ ते २० दिवस सिलेंडर मिळत नाहीत. ग्रामीण भागात गाड्या पोहोचत नाहीत. तेथे ज्यादा दर आकारणी केली जातात या साऱ्याकडे लक्ष देऊन आधी ग्राहकांना सेवा द्यावी. गॅस ग्राहकांची फसवणूक थांबवावी.अशी टीका कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत व उपाध्यक्ष सुरेश ढवळ यांनी दिला आहे.
कणकवली येथील खरेदी – विक्री संघाचे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संचालक प्रशांत सावंत उपस्थित होते.
कृषीमित्र हे मिश्र खत असून त्याचा पुरवठा आमच्या संघामार्फत शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच करण्यात आला. त्यामुळे या खतामध्ये काही दोष असल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार कंपनीकडून पुढील कार्यवाही होईल. मात्र , देवगड येथे या खताच्या नमुन्याबाबत काही दोष असतील तर ते प्रयोगशाळा अहवालानंतर निश्चित होतील. खतातील दोषांबाबत शासकीय धोरणानुसार कंपनीवर कार्यवाही होईल व शेतकऱ्यांनाही त्याबाबतचा जो काही मोबदला देय असेल ते शासन व कंपनीच्या धोरणानुसार निश्चित होईल. मात्र अद्याप प्रयोगशाळेचा अहवाल प्रलंबित असताना शासन मान्यतेच्या खताची विक्री केली असताना खरेदी विक्री संघाची बदनामी करणे संयुक्तिक नाही. अशाप्रकारे बदनामी करण्यामागे सुशांत नाईक यांचा काही वेगळा हेतू आहे का ? हे सुद्धा तपासण्याची गरज असल्याचा प्रकाश सावंत म्हणाले.
खरेदी-विक्री संघाच्या स्थापनेपासून खत, बी बियाणे याची विक्री शेतकऱ्यांना माफक दरात आम्ही करतो. कृषी मित्र या खताबाबत कुठच्याही शेतकऱ्याची संघाकडे तक्रार नाही. मात्र सुशांत नाईक हे शेतकऱ्यांना भडकवून तक्रार देण्यास भाग पाडत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आमदार नितेश राणे यांचा संघांच्या खत किंवा अन्य कोणत्याही खरेदी विक्री व्यवहाराशी कसलाही संबंध नसताना केवळ आपल्या राजकीय प्रसिद्धी पोटी सुशांत नाईक त्यांचेवर आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांवर आरोप केले की प्रसिद्धीत येता. हा त्यांचा जुनाच फंडा आहे. आता तर विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. सुशांत नाईक विधानसभेसाठी इच्छुक असल्याने खोटे आरोप करण्याचा खटाटोप करत असल्याचा टोला प्रकाश सावंत यांनी लगावला.












