सतर्क रहा सुरक्षित रहा ; जनजागृतीपर माहिती पथनाट्य मालवण बसस्थानक परिसरात सादर

महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग माध्यमातून आयोजन

अमित खोत | मालवण : महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या वतीने जनजागृतीपर माहिती पथनाट्य मालवण बसस्थानक परिसरात सादर करण्यात आले. सतर्क रहा सुरक्षित रहा हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले, एसटी व पोलीस विभागाचे अधिकारी तसेच प्रवासी, रिक्षा व्यावसायिक, नागरिक उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन सहा सूत्रे याबाबतही जनजागृती करण्यात आली. संयम ; आपत्ती कोणतीही असो मनावर ताबा परिस्थिती नुसार कृती करणे गरजेचे असते. सावधानता : कायम सावध असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपण संभाव्य नुकसानीची तीव्रता कमी कमी करू शकतो. अफवा : गोंधळात भर घालणारा घटक म्हणजे अफवा. समाज माध्यमातून मिळालेल्या माहितीची सत्यता जाणून घेत त्या प्रमाणे योग्य पाऊले उचलणे. ज्ञान : संकट प्रसंगी उपलब्ध संसाधनाचा वापर करून घेण्याचे ज्ञान असेल तर अनेकांचा जीव वाचू शकतो. भीती : आपत्तीला घाबरून न जाता धैर्य राखल्यास विपरीत परिस्थितीलाही सामोरे जाता येते. स्वतः साठी व दुसऱ्यासाठीही. सहकार्य : एकमेकांचे सहकार्य असल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते. अश्या प्रकारे माहिती संदेशही या निमित्ताने देण्यात आले.