चार जणांची साडेआठ लाखाची फसवणूक झाल्याची पोलीसांत तक्रार
छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना पिग्मीच्या नावाखालीही बनवले
फसगत झालेल्यांनी पुढे येऊन तक्रार करावी- पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचे आवाहन
राजापूर l प्रतिनिधी : रत्नागिरीकरांना कुणीही यावे आणि ‘उल्लू बनवून जावे, अशी स्थिती आजकाल येथे सुरू असलेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणांनी वारंवार समोर येऊ लागली आहे. सध्या जिह्यात आर्जु टेकसोल कंपनीने रत्नागिरीकरांना कोट्यवधींचा गंडा घातलेला असतानाच आता ‘महामुंबईकर नामक एका कंपनीने अनेकांना लाखो रुपयांना चुना लावल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. राजापूराही या कंपनीकडून अनेकांची लाखो रूपयांची फसवणूक झाल्याची बाब पुढे असून यापैकी चार जणांनी आपली या ‘महामुंबईकर नामक एका कंपनीने फसवणूक झाल्याची तक्रार राजापूर पोलीसांत केली आहे. या चार जणांची मिळून एकूण साडेआठ लाख् रूपयांची फसवणून झाल्याचे त्यांनी केलेल्या तक्रारीवरून पुढे आले असून या प्रकरणी पोलीसांनी तपास सुरू केल्याची माहिती राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे. याबाबत राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी माहिती दिली आहे.
या ‘महामुंबईकर नामक एका कंपनीने राजापूर शहरानजीक पुर्नवसन वसाहतीमध्ये आपले कार्यालय सुरू करून पैसे जमा करण्यासाठी काही प्रतिनिधींची नियुक्ती करून मोठया प्रमाणावर पैसे जमा करून अनेकांची फसवणूक केल्याची चर्चा सध्या सुरू असून या प्रकरणी ज्यांची फसवणून झाली आहे त्यांनी पुढे येऊन या विरोधात तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्हयात अशा प्रकारे वारंवार फसवणूकीचे प्रकारे होत आहेत. मात्र त्यातुन धडा घेण्याऐवजी अनेकजण भरघोस परताव्याच्या अमिषाला बळी पडून आपली पुंजी अशा बनावट कंपन्यांमध्ये काहीही खात्री न करता गुंतवत आहेत. सध्या रत्नागिरीत आर्जु कंपनीकडून कोटयावधींची फसवणूक झाल्याचे पुढे आले असताना आता या एक नवीन ‘महामुंबईकर नामक एका कंपनीने अनेकांना गंडा घातला आहे.
राजापूरातही यापुर्वी अनेकांना अशा अनेक बनावट कंपन्यांनी गंडा घातलेला असतानाही पुन्हा एकदा अनेक राजापूरकरांना या ‘महामुंबईकर नामक एका कंपनीच्या अमिषाला बळी पडले आहेत. शहरानजीक पुर्नवसन वसाहतीमध्ये आपले कार्यालय सुरू करून पैसे जमा करण्यासाठी काही प्रतिनिधींची नियुक्ती करून मोठया प्रमाणावर पैसे जमा करून अनेकांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या चार जणांनी राजापूर पोलीसांत आपली या कंपनीकडून फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. कंपनीकडून ग्राहकांकडून पैसे जमा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलले हे प्रतिनिधी स्थानिक असल्याची माहितीही पुढे आली आहे.
मोठया प्रमाणावर व्याजदराचे अमिष दाखवून मोठया रकमेच्या ठेवी जमा करतानाच दररोज पिग्मीच्या माध्यमातुन पैसे जमा करण्याचे कामही या कंपनीकडून करण्यात आले. यात काही छोटया मोठया व्यावसायिकांसह काही रिक्षा व्यावसायिकांनीही आपली पिग्मी खाती या कंपनीत सुरू केली होती. मात्र या कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याने हे सर्व पिग्मीधारकही हडबडले आहेत. त्यांनी आमचे पैसे द्या असा तगादा पिग्मी एजंटांकडे लावला आहे.
या मध्ये अनेकांची फसगत झाल्याची शक्यता असून केवळ चार जणांनी पोलीसांकडे तक्रार नोंदवीली आहे. त्या तक्रारीवरून पोलीसांकडून तपासही सुरू करण्यात आला आहे. मात्र ज्यांनी या कंपनीन पैसे गुंतवले आहेत व त्यांची फसगत झाली आहे अशांनी पुढे यावे व तक्रार करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी केले आहे. दाखल तक्रारीवरून पोलीसांनी चौकशी सुरू केली असून पोलीसांची यंत्रणा यावर काम करत असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
राजापुरातील कार्यालय बंद कंपनीने गाशा गुंडाळला?
राजापूर शहरानजीक पुर्नवसन वसाहतीमध्ये या ‘महामुंबईकर नामक एका कंपनीने सुरू केलेले कार्यालय गेले काही दिवस बंद आहे. पोलीसांनीही या ठीकाणी पहाणी केली आहे. मात्र कार्यालय बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राजापूरकरांना लाखोंचा गंडा घालुन या कंपनीने आपला गाशा गुंडाळला असल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे.
पाचल मध्ये कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न जागरूक नागरिकांना हाणून पाडला
काही महिन्यापुर्वी या ‘महामुंबईकर नामक कंपनीकडून पाचल भागात आपले कार्यालय थाटण्याचा प्रयत्न सुरू होता. जागा निश्चित करून त्या ठिकाणी फर्निचरचे कामही हाती घेण्यात आले होते. मात्र पाचल भागातील काही जागरून नागरिकांनी याबाबत विचारणा करून अनेक प्रकारच्या प्रश्नांची सरबती करून त्या कपंनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले असता तेथे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय या कंपनीने बदलला व आपला गाशा गुंडाळला होता अन्यथा पाचल मध्येही अनेकांची फसवणून झाली असती.












