सावंतवाडी रोड रेल्वेस्थानक परिसर सुशोभिकरण कामाचा उद्या लोकार्पण सोहळा

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकणातील कोकण रेल्वेच्या सर्वच प्रमुख रेल्वे स्थानकांना ‘नवे रूप व नवी झळाळी ‘ प्राप्त झाली आहे. शुक्रवार ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या मुहूर्तावर सावंतवाडी रोड स्थानकाच्या परिसर सुशोभीकरण कामाचा ‘लोकार्पण सोहळा ‘ सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते तर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आ. नितेश राणे, आ. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.

 

 

कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १२ स्टेशनच्या सुशोभिकरणाचे काम महाराष्ट्र राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे काम होत असून या १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी २३ कोटी रूपये निधी मंजुर करून दिला होता.
यातील सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरण कामासाठी सुरुवातीला ६ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर वाढीव निधी मिळून एकूण ९ कोटी ५० लाख रुपये तरतूद करण्यात आली होती. तर गणेश चतुर्थी पूर्वी सदरचे काम पूर्ण करण्याची मूदत देण्यात आली होती. मात्र, तत्पूर्वीच हे काम पूर्ण झाले असून या कामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी संपन्न होत आहे.

 

 

रेल्वे स्थानकांच्या या सुशोभिकरण कामांचे ऑनलाईन भुमिपूजन गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत,गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, माजी आमदार राजन तेली आदी उपस्थित होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किनी, उप अभियंता सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस रात्र हे काम सुरु होते.

 

 

सावंतवाडी रोड स्थानकाच्या या सुशोभिकरण कामाअंतर्गत रेल्वेस्थानक मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण, फुटपाथ, आर सी सी गटर, संरक्षक भिंत, प्रवेश द्वार आकर्षक कमान, बस थांबा, रिक्षा थांबा, बगिचा, दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग व इतर सुशोभीकरण आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ९ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्या माध्यमातून या स्थानकाचे नवे व आकर्षक असे रूप साकारले आहे.