खेड-मुंबकेतील इमरान फकीने सर केले ५ हजार ७८० मीटर उंचीचे किलीमांजारो शिखर

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील मुंबके गावचे सुपुत्र इमरान फकी यांनी दक्षिण आफ्रिकेतील ‘किलीमांजारो हे सर्वोच्च शिखर सर करत कोकणचे नाव सातासमुद्रापार पोहचवण्याची किमया केली आहे. ५.७८० मीटर उंचीवरील किलीमांजारो शिखरावर तिरंगा फडकावताना त्याने यापूर्वीचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे.
इमरान फकी ११ ऑगस्टपासून  शिखर सर करण्याच्या मोहिमेवर निघाले. सकाळी पावसामुळे अडथळा निर्माण झाला. त्यानंतर मोशी टाऊनमधून
प्रवासाला सुरुवात झाली. मारांगू गेट येथून मार्गक्रमण करताना आव्हानात्मक रेन फॉरेस्टमधून त्यांना प्रवास करावा लागला.
चिखलासह खडतर प्रदेश असतानाही सलग ८ कि.मी. अंतर कापत सायंकाळी ६.३० पर्यंत २,७२० मीटर उंचीवरील मंदारा हट्सवर ते पोहचले. दुसऱ्या दिवशी तेथूनच त्यांनी चढाईला सुरुवात केली. १२.५ मीटर अंतर कापत ‘होरोम्बो हट्स’ हा ३,७२० मीटर उंचीचा परिसर पार करत सायंकाळी ४.३० वाजता तेथे पोहचताना दगडांनी खचाखच भरलेल्या पायवाटेतून मार्गस्थ होताना त्यांची दमछाक झाली.
शीत लहरींमुळे त्यांचा प्रवास जिकरीचा बनला होता. अखेर १३ ऑगस्ट रोजी होरोम्बो हट्स ते कियो हट्स ही ४,७२० मीटरपर्यंतची ९ कि. मी.ची चढाई पार करत ते शिखरानजीकच्या बेस कॅम्पवर पोहचले.
 १५ औं गस्ट रोजी ५,६०० मीटर उंचीचे गिलमन पॉईंट हा ९ तासांच्या उभ्या चढाईने सुरू झालेला प्रवास रोमहर्षक अन् तितकाच खडतर होता. उभी चढाई करताना झालेली दमछाक कायम स्मरणात राहील. हा दिवस आव्हानात्मक ठरल्याचेही इमरान फकी यांनी सांगितले. सरतेशेवटी ५,७८० मीटर उंचीवरील दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च किलीमांजारो शिखर ११ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर करत उंची गाठली. त्यानंतर ५,८९५ मीटर उंचीवर उभे राहून सकाळी १०.३० वाजता उडुरू शिखरावर पोहोचले. विजयाने हर्षमरीत झालेल्या इमरान फकी यांनी ५२० फूट लांब व ४ फूट उंचीचा जगातील लांब भारतीय ध्वज अभिमानाने दक्षिण आफ्रिकेच्या शिखरावर फडकवला.टांझानिया सरकारने कर्तृत्वाचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांच्या प्रवासाची सांगता झाली.