महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसा छत्रपतींचा पुतळा पुन्हा उभारणार : दीपक केसरकर 

घटना दुर्दैवी कोणीही राजकीय भांडवल करू नये 

सावंतवाडी । प्रतिनिधी : 

मालवण राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा अपघात प्रकरणी कोणीही राजकीय भांडवल करू नये. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. सदरचा महाराजांच्या पुतळा महाराष्ट्र सरकार पुन्हा उभारून देईल आणि तो उभारताना संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल, महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसा असा उभारला जाईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालवण राजकोट येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, हा अपघात करत असताना त्यामध्ये काही शुभ संकेतही असावेत अशी आपली भावना आहे. कारण हा पुतळा किल्ल्याच्या तटापेक्षा जास्त उंचीचा असावा अशी सिंधुदुर्ग वासियांची मागणी होती. परंतु तो दीडशे फूट इतका उभारण्यात आला होता. मात्र, आता नव्याने उभारताना तो पुतळा दीडशे फूट इतका उंचीचा उभारावा यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न असणार आहेत आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधानांना आपण या ठिकाणी आणू शकलो तर ती महाराजांसाठी एक प्रकारे आदरांजली असेल असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, सदरचा पुतळा हा नौदलाकडून उभारण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी आरोप करणे हा नौदलाचा अपमान असेल. नौदलानेही महाराष्ट्रासाठी बलिदान दिले आहे आणि अजूनही देत आहेत त्यामुळे त्यांच्या भावनांची कदर या ठिकाणी केली पाहिजे. उद्या आपण त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहे, असे ते म्हणाले.

मुळात हा पुतळा नव्याने उभारताना तो १०० फूट उंचीचा तसेच चबुतरा ५० फूट असा मिळून दीडशे फूट उभारला जावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे. तशा प्रकारची चर्चा आपण मुंबई येथे गेल्यावर करणार आहे. परंतु या दुर्घटनेचे कोणीही राजकीय भांडवल करू नये,असे आवाहन देखील त्यांनी केले.