विरोधकांकडून केवळ राजकारण सुरु : उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर केला जोरदार प्रहार
मालवण | प्रतिनिधी : किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला ही दुर्दैवी घटना आहे. विरोधक याचे राजकारण करत आहेत. मात्र आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. लवकरात लवकर महाराजांचा भव्यदिव्य पुतळा पुन्हा उभा करणे हेच प्राधान्य असेल. असे प्रतिपादन भाजपा जेष्ठ नेते खा. नारायण राणे यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत केले.
दरम्यान, उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवरही खा. नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केला. हिंदुत्व आणि महाराज यांच्या नावावर फक्त पैसे कामवणे हेच उद्धव ठाकरेंचे काम आहे. अडीज वर्षे मुख्यमंत्री पद असूनही कोणताही विकास केला नाही. बालवाडी तरी उभारली काय? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ टीका करणे आणि राजकारण करणे हेच त्यांचे काम आहे. मात्र भाजपा युतीचे धोरण हे सर्वसामान्य जनतेला अपेक्षित विकास हेच आहे. असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेलेल्या खा. नारायण राणे यांनी नियोजित दौऱ्यानुसार किल्ले राजकोट येथे भेट दिली. त्यानंतर मालवण निलरत्न निवासस्थानी खा. नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आम. नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भव्यदिव्य पुतळा पुन्हा उभारणी होईल
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. भव्यदिव्य पुतळा पुन्हा उभारणी किल्ले राजकोट येथे होईलच. तसेच महाराजांचा पुतळा कोसळला त्याची चौकशी होऊन पुढील कारवाई होईल. असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.
आम्ही चिरीमिरी काही करत नाहीत
किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी पाहाणी केली. तिथून येतं असताना ठाकरे गटाच्या काहींनी त्या ठिकाणी गोंधळ घातला. आम्ही जाग्यावर उभे होतो. आम्ही हटणार नाही ही भुमिका आम्ही ठेवली. त्यांनी दुसऱ्या बाजूने जाउद्ये असे सांगितले. आम्ही काहीच केले नाही. आम्ही चिरीमिरी काहीच करत नाही. असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.









