चंपक मैदान युवती अत्यचार प्रकरण; दोन दिवसात तपासात येणार स्पष्टता

 

सीसीटीव्ही फुटेज, व्हॉटसअप कॉल लॉग, वैद्यकीय अहवाल करणार चित्र स्पष्ट

रत्नागिरी । प्रतिनिधी
चंपक मैदान येथे वैद्यकिय परिचारीकेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी रत्नागिरी पोलीस पूर्ण तपासाच्या जवळ पोहोचले असून घटनेचे चित्र बर्यापैकी स्पष्ट झाल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी व्हॉटसअप कंपनीकडे कॉल लॉगची मागणी केली असून येत्या दोन दिवसात सत्य समोर येणार असल्याचे श्री. कुलकर्णी म्हणाले. पिडित युवतीची वैद्यकिय चाचणी पाठवण्यात आलेल्या लॅबशी संपर्क करुन वैद्यकिय अहवाल लवकरात लवकर पाठवण्यात बाबत सांगण्यात आले आहे. तरीही त्याला काही दिवसांचा कालावधी लागू शकतो असेही ते म्हणाले. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 7 ते 8 सीसीटिव्ही फूटेज पोलिस विभागाने मिळवले आहेत. या प्रकरणाचा सर्व अंगानी तपास करुन टेक्निकल डाटा मिळाल्यावर दोन दिवसात या प्रकरणाचा छडा लागणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तर रत्नागिरीच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काही दिवसांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरीही रत्नागिरी शहरातील नागरिक मदतीसाठी धावणारे आहेत. पिडितांना मदत मिळण्यासाठी पोलिस विभागाच्या ‘112’ सेवेमुळे 10 ते 15 मिनिटांमध्ये मदत मिळत असल्याने ते महत्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच शहरातील शाळा, कॉलेज याठिकाणी दामिनी पथकाची गस्त सुरु असून त्यांच्याकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी समुपदेशन केले जात आहे. पोलिस विभागाच्या 5 मोबाईल वाहने सतत कार्यरत असून 15 कर्मचारी आणि वाहतुक पोलिस रात्री गस्त घालत असतात. त्यामुळे नारिकांनी घाबरण्याचे कारण नसून रत्नागिरी शहर सुरक्षितच आहे असे जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले.