हिंदू देवतांचे विडंबन करणाऱ्या मंगलम कापूर कंपनीला दणका देणार

 

आमदार नितेश राणे यांची बांदावासियांना ग्वाही

शहरप्रमुख बाबा काणेकर यांनी वेधले लक्ष

बांदा (प्रतिनिधी) : जाहिरातीतून हिंदू देवतांचे विडंबन करणाऱ्या मंगलम कापूर कंपनीला वेगळ्या पद्धतीने दणका देण्याची ग्वाही आमदार नितेश राणे यांनी बांदावासियांना दिली. याबाबत भाजपा बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी आ. नितेश राणे यांचे लक्ष वेधले. हिंदू देवतांच्या विडंबनाचे असे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाहीत. मंगलम कंपनीवर कडक कारवाई केली जाईल. तसेच खासदार नारायण राणे यांच्या मार्फत केंद्रीय प्रसारण मंत्र्यांकडूनही कारवाई करू, असे आश्वासन आ. नितेश राणे यांनी दिले.

मंगलम कापूर कंपनीने तीन वर्षांपूर्वी श्रीरामांचे विडंबन करणारी एक जाहिरात प्रसारित केली होती. त्या विरोधात बांदा शहरांमध्ये मोठे आंदोलन झाले होते. त्याची तत्काळ दखल तेव्हा आमदार नितेश राणे यांनी घेत त्यांना दणका दिल्यानंतर त्या कापूर कंपनीने जाहीर माफी मागितली होती. ती वादग्रस्त जाहिरातही हटवली होती. मात्र, एक वर्षानंतर त्या कंपनीने पुन्हा सर्वत्र विविध वाहिन्यांवर तसेच युट्युबवर तीच जाहिरात सुरू केली आहे.

एकदा समज देऊन सुद्धा कंपनीने परत तीच कृती जाणूनबुजून केलेली आहे. हा लाखो रामभक्तांचा जाहीर अपमान आहे. याबाबत सर्व भाविकांच्या भावना संतप्त आहेत. सदर बाब बांदा भाजप शहराध्यक्ष बाबा काणेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. ही जाहिरात टीव्ही वरून तसेच युट्युब वरून तात्काळ हटवली जावी. तसेच या कंपनीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी काणेकर यांनी केली.

हिंदू देवतांचे विडंबन कदापि सहन करून घेणार नाही. त्या कंपनीला वेगळ्या पद्धतीने दणका दिला जाईल. तसेच खासदार नारायण राणे यांच्यामार्फत केंद्रीय प्रसारण मंत्री यांचे लक्ष वेधण्यात येईल. त्या कंपनीवर निश्चितच कारवाई करू असे आ. नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, भाजपाचे युवा कार्यकर्ते निलेश कदम आदी उपस्थित होते.