संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड यतिश खानोलकर आणि ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले
- मालवण | प्रतिनिधी : विनयभंग प्रकरणी मालवण तालुक्यातील संशयीतास मे. जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आला आहे. संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड यतिश खानोलकर आणि ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.
मालवण तालुक्यातील एका गावातून फिर्यादी सकाळी सहा वाजताच्या दरम्याने स. का. पाटील कॉलेज मालवण येथे जाण्यासाठी बस स्टॉप कडे जात असताना तिला अनोळखी इसमाने अडवून फिर्यादीशी अश्लील वर्तन करुन मारहाण केली व हातातील मोबाईल रस्तावर आपटून नुकसान केले व तेथून पळून गेला, अशा आशयाची तक्रार फिर्यादीने मालवण पोलीस ठाण्यात 2 ऑगस्ट 2024 रोजी दिली होती. मालवण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 126(2), 324(4) अन्वये अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर तपासादरम्यान फिर्यादीने तिचेसोबत अश्लील वर्तन केल्याचे कथन केल्याने पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 74, 75(1)(2) ही कलमे वाढविली होती. 18 ऑगस्ट रोजी रोजी पोलिसांनी वडाचापाट ता. मालवण येथील रविंद्र सूर्यकांत परब वय 28 वर्षे याला संशयित म्हणून अटक केली व मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुडाळ यांच्या न्यायालयात हजर करुन अधिक तपासकामासाठी 4 दिवस पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यावर आरोपीच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून मे. न्यायालयाने पोलीस कस्टडीची मागणी फेटाळली मात्र नवीन कायद्यातील सुधारणेनुसार कलम 75 अन्वयेचे विनयभंगाचा गुन्ह्याबाबत खटला चालविण्याची अधिकारीता मे. सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्याची तरतूद केल्याने आरोपीचा जामीनअर्ज मे. न्यायालयाने नामंजूर केला व आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
त्यामुळे आरोपीच्या वतीने ओरोस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनअर्ज करण्यात आला होता. या जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी आरोपीस रक्कम रु. 50,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये आरोपीने तपासकामात ढवळाढवळ न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे व पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.











