कृतज्ञता व्यक्त करायचे व्रत “श्री गणेश चतुर्थी “

चंद्रशेखर तेली, जामसंडे.

कथा शिवपुराणातली आहे. भगवान शंकरांनी आपल्या अमोघ त्रिशूलाने पार्वतीनंदन दंडपाणीचे मस्तक जेव्हा धडावेगळे केले तेव्हा पुत्रवत्सला जगज्जननी शिवा अतिशय दुःखी झाली. तिने रागाने बऱ्याचशक्ती उत्पन्न केल्या आणि सर्वच हाहाकार माजवण्याची आज्ञा दिली. त्या शक्तिनी सर्वत्र संहार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे देवगण घाबरून भयनाशिनी जगदंबेला प्रसन्न करण्यासाठी उत्तर दिशेकडून एका हत्तीचे शीर घेऊन आले व ते दण्डपाणी यांच्या धडाला जोडले. त्यामुळे पार्वतीचा पुत्र जीवंत झाला. गजमुख असलेल्या आपल्या पुत्राला पाहून त्रैलोक्य जननी शिवा अत्यंत प्रसन्न झाली.

. पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू, व शिव यांनी गणेशाला ‘ सर्वाध्यक्ष ‘ घोषित केले.
शिवानी सुद्धा आपला पुत्र गणेश याला अनेक वर प्रदान करताना म्हटले, ” कुठल्याही कार्यातील विघ्न नाश करण्यासाठी घेतलेले तुझे नाव सर्वश्रेष्ठ ठरेल. तू सर्वांना पूज्य होशील. आता माझ्या सर्व गणांचा तू अध्यक्ष हो. ”
त्यानंतर आशुतोष यांनी आशीर्वाद देताना म्हटले, ” हे गणेश्वर, तू भाद्रपद महिन्यात चतुर्थीला चंद्रोदय झाल्यावर उत्पन्न झाला आहेस. म्हणून या तिथीला तुझे उत्तम व्रत करायला हवे. या व्रतामुळे सर्व कामे सिद्धीस जातील.
जे लोक तुझे विशेष व्रत करतील, त्यांची विघ्ने नाश पावून कार्यसिद्धी होईल.

‘गणेश पुराणा’त भाद्रपद चतुर्थीचे महात्म्य वर्णन केले आहे.
चतुर्मुख ब्रम्हाने तर असे म्हटले आहे की, या चतुर्थी व्रताचे निरुपण किंवा महात्म्य गाणे सहज सोपे नाही.
‘मुदगल पुराणा ‘तही श्री गजानाने लोभासुराच्या त्रासापासून देवांना संरक्षण देण्यासाठी या दिवशी अवतार घेतला असे म्हटले आहे. सर्व तिथीची माता ‘चतुर्थी तिथी’ असल्याने या दिवसाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
भक्त सुखदायक परम प्रभू गणेश या भाद्रपद शुक्ल चतुर्थीला प्रकट झाले असल्याने या दिवशी मध्यान्नकाळात गणेश भगवान गणेशांची मातीची मूर्ती करून तीची भक्तीभावाने पूजा करून, गणेश स्मरण, चिंतन, भजन, नामजप केल्याने
त्याचे उत्तम फळ मिळते.
असे पूजन केल्याने मानवाला शिवलोक प्राप्त होतो. या दिवशी चंद्र दर्शन करणे निषिद्ध मानले आहे. जर चुकून दर्शन झाले तर, या दोषशांतीसाठी श्रीमद्भागवतातील दहाव्या स्कंदातील 57 व्या अध्यायाचे वाचन, किंवा श्रवण करावे असे अग्निपुराणात सांगितले आहे.
गणपती पूजन करताना गणेशाना प्रिय असलेले दुर्वांकुर वहावेत. मोदकाचा नैवेद्य करावा. त्यामुळे गणेश प्रसन्न होऊन समस्त कामनांची पूर्ती करतात.

गणेश चतुर्थीचे व्रत करण्यामागे आपण विचार केला तर अनेक बाजू आपल्या लक्षात येतात. त्यापैकी ‘कृतज्ञता’ व्यक्त करण्याचा हा सण किंवा व्रत म्हटले तर वावगे ठरणार नाही. संपूर्ण जगात अनेक देशात हे व्रत केले जाते. पण आपल्याकडे यामागचा एक विचार मनाला अधिक भावतो, तो म्हणजे कृतज्ञतेचा! आपला अन्नदाता शेतकरी आपल्या शेतात पीक पिकवतो. काळी माती एका दाण्यापासून हजारो दाणे आपल्याला परत देते. आपले भरण पोषण करते. तिच्याबद्धल आपल्या मनात असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी शेतातली मूठभर माती घरी आणून तीची पूजा केली जायची. दुसऱ्या दिवशी ती परत शेतात नेवून ठेवली जायची. मातीप्रति असलेली ही कृतज्ञता व्यक्त केली जायची. त्यातच गणपती रूप पाहिले जायचे. ‘दीड दिवसाचा गणपती’ ही कल्पना त्यामागे आहे. इतका सखोल विचार करणारा आपला समाज मात्र आज ह्या व्रताला उत्सवाचे स्वरूप देऊन कश्या पद्धतीने साजरा करतो हे पाहिले की अचंबित व्हायला होते. असो.

भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.

या व्रताकडे पाहताना त्याबद्धल जाणून घेताना
आज मात्र आपण श्री गणरायाचे आपल्या घरातील येणे अत्यंत उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरे करून हे व्रत संपन्न करावे. अगदी अनंत चतुर्दशी पर्यंत गजाननाची सेवा करून त्याच्या चरणी नतमस्तक व्हावे.