मसुरे | झुंजार पेडणेकर मालवण तालुक्यातील पळसंब खालचीवाडी येथे दत्ता साटम, कमलेश साटम, मोहन साटम आणि रवी साटम कुटुंबियांच्या दिड दिवसाच्या गणेशोत्सवाची रविवारी उत्साहात सांगता झाली. या कुटुंबियांच्या घरी गणेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. मुळ मालवण तालुक्यातील कोईल येथील साटम परिवार यांच्या घरी मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत नाही. त्यांच्या घरी फक्त फुलांची आरास करण्यात येते.

एक गाव एक गणपती अशी ख्याती असलेला कोईळ येथील मुळ साटम परिवार अनेक ठिकाणी विखुरलेला असून त्यांचा गणपती हा कोईळ येथील गणपती मंदिरात असल्याने हे सर्व कुटुंबीय फुलपात्रीची पूजा करतात. दीड दिवसानी विधिवत या फुलपात्रीचे विसर्जन करतात. अशा प्रकारे एक वेगळा गणेशोत्सव पळसंब येथील साटम कुटुंबीय साजरा करतात. फक्त गणपतीची मूर्ती ही चार कुटुंबे घरी आणत नाही. पाटावर जंगलात मिळणारी फुलपात्री ठेवून ही कुटुंबे दीड दिवस मनोभावे पूजा करतात. परंतु बाकी आरती, भजन आदी सर्व कार्यक्रम इतर ठिकाणी होणाऱ्या उत्सवसारखेच असतात.
या उत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. गेली अनेक वर्ष ही उत्सवाची आगळी वेगळी परंपरा जपली जात आहे. कोकणात अनेक भागात आगळ्या वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याच्या प्रथा परंपरा आहेत. आणि अशीच आपली गणपती मूर्ती घरी न पूजता प्रतिकात्मक म्हणून फुलपात्री पुजायची व त्याचेच पाटा वरून विसर्जन करायचे ही परंपरा येथील कुटुंबीय जपत आहेत.












