उबाठा गटाचे उपविभाग प्रमुख विलास पावसकर यांच्यावर गुन्हा दाखल
वेंगसर ग्रामपंचायत कार्यालयात घडला प्रकार
वैभववाडी l प्रतिनिधी : महानेट कंपनीचे दोन कर्मचारी व ग्रामस्थ रघुनाथ मंचेकर यांना ग्रामपंचायतमध्ये बंद करून ठेवल्याप्रकारणी ग्रामपंचायत सदस्य तथा उबाठा गटाचे उपविभाग प्रमुख विलास राघो पावसकर वय 60 यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत सरपंच सुगंधा रघुनाथ मंचेकर यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वेंगसर ग्रामपंचायत कार्यालय येथे घडली.
ग्रामपंचायत कार्यालय वेंगसर येथे महा नेट कंपनीचे कर्मचारी निलेश अशोक राणे, व प्रथमेश दीपक तांबट हे नेट जोडणीसाठी गेले होते. ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्यामुळे ते सरपंच सुगंधा मंचेकर यांच्या घरी गेले. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात काम करायचे आहे असे सांगितले. सरपंचानी आपले पती रघुनाथ मंचेकर यांच्याकडे कार्यालयाची चावी देऊन त्यांच्या सोबत पाठवले. त्यांनी महा नेटच्या कर्मचाऱ्यांना कार्यालय उघडून दिले व ते स्वतः त्यांच्या सोबत कार्यालयात थांबले होते. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य तथा उबाठाचे उपविभाग प्रमुख विलास पावसकर दारूच्या नशेत या ठिकाणी येऊन तुम्ही कोणाच्या परवानगीने कार्यालय उघडलात असा प्रश्न करीत. ग्रामपंचायत कार्यालय बाहेरून बंद करून घेतले. कर्मचाऱ्यांनी विनंती करूनही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे कंपनीचे तालुका समन्वयक राम पाटील यांना माहिती दिली. त्यांनीही घटनास्थळी जाऊन पावसकर यांना दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र त्यांनाही त्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. राम पाटील यांनी पोलीस पाटील सुनील कांबळे यांना माहिती दिली. त्यांनीही येऊन कार्यालय उघडा असे सांगूनही कार्यालय उघडले नाही. त्यामुळे पोलीस पाटील यांनी वैभववाडी पोलिसांना माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस हवालदार शैलेश कांबळे घटनास्थळी पोहचले. त्यांच्यासोबतही पावसकर यांनी हुजत घातली. अखेर पोलिसांनी बंद केलेल्या कर्मचाऱ्यांची व श्री मंचेकर यांची दोन तासानंतर सुटका करण्यात आली. या प्रकरणी सरपंच सुगंधा मंचेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास पावसकर याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.











