गणेशोत्सवातील देखाव्यातून दिला महिला सुरक्षितेचा अनमोल संदेश

 

वैजी येथील मंगेश भडवळकर यांचा देखावा ठरतोय खास आकर्षण

संतोष कुळे | चिपळूण : गणेशोत्सव आणि विविध देखावे हे समीकरण आता सर्रास सगळीकडे पहावयास मिळते. मात्र काही देखावे असे असतात की समाजात जनजागृतीपर संदेश देणारे ठरतात. असेच देखावे गेली अनेक वर्षे वैजी भडवळकरवाडी येथील मंगेश वामन भडवळकर या तरुणाने गणेश उत्सवात साकारले आहेत. यावर्षी ही मंगेश यांनी महिला संरक्षण करण्याचा संदेश देखाव्यातून दिला आहे.

चिपळूण तालुक्यातील वैजी भडवळकरवाडी येथील मंगेश वामन भडवळकर यांनी दरवर्षी गणेश उत्सवामध्ये आपल्या हस्त कौशल्यातून विविध देखावे साकारले आहेत. यामध्ये कुटुंबाचे नेहमी सहकार्य लाभलेले आहे. मुलगी वाचवा, कालिया मर्दन, वृक्ष लागवड, जि . प. शाळा वाचल्या पाहिजेत अशा विविध प्रकारचे देखावे त्यांनी गेल्या काही वर्षात साकारले आहेत. हे देखावे पाहून अनेक गणेश भक्तांकडून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

यावर्षी सुद्धा मंगेश भडवळकर यांनी महिला सुरक्षितता काळाची गरज, महिलांचे संरक्षण करणे फार गरजेचे आहे आणि तो त्यांचा हक्क आहे, या विषयाचा आधार घेत त्यांनी सुंदर असा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी तालुक्यातील अनेक गणेश भक्तांनी वैजी येथे जाऊन बाप्पाचे दर्शन घेत देखावा पहिला आहे. सौ. रसिका भडवळकर, मंगेश भडवळकर आणि त्यांचे चुलत बंधू यांनी हा देखावा तयार करण्यासाठी अथक प्रयत्न घेतले आहेत. गेले दहा दिवस हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंगेश हे स्वतः वायरमन या पदावरती कार्यरत असून त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक कलेची लहानपणापासूनच आवड आहे. त्यांचे वडील वामन भडवळकर हे सुद्धा एक उत्कृष्ट भजनी बुवा आहेत. मंगेश सुद्धा एक उत्तम कलाकार आहे. संपूर्ण कुटुंब सांस्कृतिक कला आणि सामाजिक सेवेत अग्रेसर असते.
त्यांनी साकारलेला महिला सुरक्षेचा देखावा तालुक्यामध्ये विशेष आकर्षण ठरत आहे. आतापर्यंत गणेश उत्सव सजावट स्पर्धेतील अनेक पारितोषिके मंगेश आणि कुटुंबाने जिंकलेली आहेत. त्यामुळे या वर्षी ही त्यांना या देखाव्यासाठी निश्चितच पारितोषिक मिळेल अशी अनेक गणेश भक्तांनी इच्छा प्रकट करून शुभेच्छा दिल्या आहेत.